यवतमाळ जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर पाचजणांना सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 07:54 PM2020-06-04T19:54:24+5:302020-06-04T19:55:07+5:30
गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही गुरुवारी जिल्ह्यात चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही गुरुवारी जिल्ह्यात चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
गुरवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या चारपैकी तीन युवक (वय 28 वर्षे, 33 वर्षे आणि 36 वर्षे) हे महागाव येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तिच्या निकटच्या संपर्कातील आहे. तर एक 15 वर्षीय युवती ही नागापूर, ता. उमरखेड येथील मृत पॉझिटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी 46 वर पोहचली होती. मात्र आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 वर आली आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 50 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 154 आहे. यापैकी 41 अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून 111 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिका-यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट
महागाव, उमरखेड या भागातून बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आज नागापूर, ता. उमरखेड येथील प्रतिबंधित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या निगराणीखाली पल्स आॅक्सीमीटर आणि थर्मल स्कॅनींगने नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लो रिस्क संपर्कातील नागापूर येथील 100 जण आणि महागाव व पुसद येथील प्रत्येकी 50 जण असे एकूण 200 नागरिकांना जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये आज रात्री भरती करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी स्थानिक यंत्रणेला दिले.
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून गृह विलगीकरणात राहावे. बाहेरून आलेल्यांनी स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. असे प्रकार आढळल्यास गावक-यांनी संबंधित तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, ठाणेदार किंवा इतर प्रशासकीय यंत्रणेस त्वरीत कळवावे. जेणेकरून गृह विलगीकरण नियमाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिविरुध्द भादंविच्या कलम 188 नुसार गुन्हा नोंद करता येईल. तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना कोव्हिडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, सारी, आयएलआय व इतर लक्षणे असल्यास त्यांनी जवळच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटल किंवा 07232-239515 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.