यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीची गुहेत डांबून हत्या; वनवर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 07:06 PM2021-04-26T19:06:51+5:302021-04-26T19:07:27+5:30

Yawatmal news झरी तालुक्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रात एका वाघिणीला गुहेत डांबून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

In Yavatmal district, Tigress was killed in a cave | यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीची गुहेत डांबून हत्या; वनवर्तुळात खळबळ

यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीची गुहेत डांबून हत्या; वनवर्तुळात खळबळ

Next
ठळक मुद्देमारेकऱ्यांनी पंजेही पळविले, मुकुटबन वनपरिक्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : झरी तालुक्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रात एका वाघिणीला गुहेत डांबून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिची निर्दयतेने हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. सोमवारी वनविभागाने या घटनेची माहिती उघड केली. या घटनेने वनवर्तुळ चांगलेच हादरून गेले आहे.

पांढरकवडा वनविभागांतर्गत येणाऱ्या मुकुटबन वनपरिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रात वनकक्ष क्रमांक ३० मध्ये ही घटना उघडकीस आली. एका नाल्याला लागून असलेल्या गुहेत वाघीण मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी दुपारी पांढरकवडाचे विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक, मुकुटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रकाश महाजन तसेच मानद वन्यजीवरक्षक डॉ. रमजान विराणी हे घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केली असता, वाघीण नाल्याला लागून असलेल्या गुहेत मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यात ताराचा फास अडकल्याचे व भाल्यासारख्या अणकुचीदार हत्याराने तिला मारल्याचे तसेच गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे दिसून आले. वाघिणीचे वय अंदाजे चार वर्षांचे आहे.

मारेकऱ्यांनी वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेले. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे (नागपूर) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, वणीचे डॉ. अरुण जाधव, झरीचे डॉ. एस.एस. चव्हाण, मुकुटबनचे डॉ. डी.जी. जाधव, मारेगावचे डॉ. डी.सी. जागळे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे वनविभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याप्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघिणीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.

मृत वाघीण गर्भवती?

गुहेत डांबून हत्या करण्यात आलेली वाघीण ही गर्भवती होती. तिच्या पोटात चार बछडे होते, अशी चर्चा आहे. परंतु वनविभागाने त्याची अद्याप पुष्टी केलेली नाही. लवकरच ती बछड्यांना जन्म देणार होती, असे सांगण्यात येते. त्यामुळेच ती गेल्या काही दिवसांपासून मांगुर्ला नियतक्षेत्रातील एका नाल्याजवळील गुहेत ये-जा करत होती, असे सांगितले जाते. मारेकरी तिच्यावर लक्ष ठेवून होते. ती गुहेत शिरताच दगडांनी गुहेचे तोंड बंद करण्यात आले. त्यानंतर एका मोठ्या छिद्रातून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिची हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. गंभीर बाब ही की, दोन वर्षांपूर्वीदेखील याच परिसरात अशाच पद्धतीने एका वाघाची हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी मृत वाघाला तेथेच जाळून टाकले होते, अशी चर्चा आहे. या घटनेची वनविभागात मात्र कुठेही नोंद नाही. या परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे या भागात वाघाची नेहमीच दहशत असते. यातूनच अशा पद्धतीने वाघाला ठार मारण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

रानडुक्कर अथवा रोह्याच्या शिकारीसाठी कुणी तरी फास लावला. तो वाघिणीच्या गळ्यात अडकला. प्रकरण अंगलट येईल, या भीतीने नंतर वाघिणीला ठार मारण्यात आले असावे, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. वाघीण गर्भवती होती की नाही, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे.

- एस. व्ही. दुमारे, सहायक वनसंरक्षक, पांढरकवडा

Web Title: In Yavatmal district, Tigress was killed in a cave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ