यवतमाळ: महिनाभरात १६ अल्पवयीन तरुणींचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:57 PM2018-04-24T13:57:04+5:302018-04-24T13:57:12+5:30
आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. या तरुणींना फूस लावून पळविल्याच्या तक्रारी पोलिसात देण्यात आल्या असून पोलीस अशा ‘बेपत्ता’ तरुणींचा शोध घेत आहे.
सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून प्रेमाचे होणारे उदात्तीकरण आणि आकर्षण यातून अल्पवयीन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेम पाशात अडकत आहे. कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले की, मग त्या कुटुंबावर नको तो प्रसंग उद्भवतो. शिक्षण घेण्याच्या वयात प्रेमाच्या आनाभाका घेत युगुल बेपत्ता होते. सामाजिक बंधने झुगारुन ही मंडळी पलायन करतात. यवतमाळ शहरातील १४ ते १७ वयोगटातील तरुणी आणि १८ ते २५ वयोगटातील तरुण अशाच प्रेमपाशात अडकून घरदार सोडत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही मंडळी आई-वडिलांचा विचारही करीत नाही. मुलगी बेपत्ता झाल्यावर मात्र घराच्यांच्या पायाखालची वाळू सरकते. पालक पोलीस ठाणे गाठून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देतात.
यवतमाळ शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या अशा घटनांची आकडेवारी मोठी आहे. यावरूनच भीषणता लक्षात येते. मार्च अखेरपर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यातून पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन मुली, लोहारा, ग्रामीण पोलीस ठाणे येथेही अशा तक्रारींची नोंद आहे. विशेष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलेच प्रेमीयुगुल पसार झालेत, असे नाही तर एक २२ वर्षीय विवाहिताही आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचे पुढे आले आहे. काही प्रकरणात पोलिसांनी तपास करून प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. केवळ आकर्षणातून उचललेले हे पाऊल सर्वांनाच मन:स्ताप देणारे ठरत आहे.
पालकांनो मुलांना वेळीच समजून घ्या
अनेक पालक आपल्या मुलांवर नको तितका विश्वास ठेवतात. आमचे मुले तशी नाही, असे सांगतात. परंतु तारुण्य सुलभ मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ताही पालकांना लागत नाही. मुलांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणीची नावे माहीत करून घेणे गरजेचे आहे. मोबाईल आणि व्हॉटस्अॅपही तपासण्याची गरज आहे. अन्यथा पालकांवर मन:स्ताप करण्याची वेळ येऊ शकते.