Yavatmal: अखेर जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षांनी दिला राजीनामा, पत्रपरिषदेतून घोषणा, अविश्वासाची होती तयारी
By सुरेंद्र राऊत | Published: August 1, 2023 06:19 PM2023-08-01T18:19:55+5:302023-08-01T18:20:27+5:30
Yavatmal: जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र कोंगरे यांना थेट प्रदेशाध्यक्षांनी तूर्त थांबा असा आदेश दिला, त्यामुळे त्यांचा राजीनामा होऊ शकला नाही, दुसरीकडे मात्र अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, याकरिता दबाव निर्माण केला जात होता.
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र कोंगरे यांना थेट प्रदेशाध्यक्षांनी तूर्त थांबा असा आदेश दिला, त्यामुळे त्यांचा राजीनामा होऊ शकला नाही, दुसरीकडे मात्र अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, याकरिता दबाव निर्माण केला जात होता. अखेर मंगळवारी दुपारी पत्रपरिषद घेऊन टिकाराम कोंगरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.अध्यक्षांच्या भूमिकेकडे १६ संचालकांचे लक्ष लागले होते. राजीनामा दिला नसता तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारीही केली होती.
४ जानेवारी २०२१ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेऊन कामकाज सुरू केल्याचे टिकाराम कोंगरे यांनी सांगितले. त्या वेळी अध्यक्षपदाबाबत कुठलाही फार्म्युला निश्चित झाला नव्हता. कॉंग्रेसच्या नेते मंडळींनी राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर यांचा फोनही आला होता. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तूर्त थांबा असा आदेश दिला. मात्र स्थानिक नेत्यांच्या निर्देशावरून व सदसद्विवेकबुद्धीने राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे टिकाराम कोंगरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अध्यक्ष म्हणून काम करताना सर्व संचालक, कॉंग्रेस नेते, पालकमंत्री, आमदार अशा सर्वच पक्षीय नेत्यांनी सहकार्य मदत केल्याचेही कोंगरे यांनी सांगितले. नव्या अध्यक्षाला आपल्या शुभेच्छा राहील, असे म्हणत त्यांनी सत्यमेव जयतेचा नारा देत सूचक इशाराही पत्रपरिषदेतून दिला. या वेळी बँक संचालक प्रकाश पाटील देवसरकर, शिवाजी राठोड, राजूदास जाधव, ॲड. शंकरराव राठोड, निमंत्रित संचालक मोहन राठोड उपस्थित होते. पत्रकारांसमक्षच टिकाराम कोंगरे यांनी राजीनाम्याचे पत्र बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद मिरगे यांंना सुपूर्द केले.
टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉंग्रेसमध्ये मोहीमच उघडण्यात आली. नेते मंंडळींनीही राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केला. राजीनामा व्हावा परंतु नवीन येणारा अध्यक्ष कॉंग्रेसचाच राहावा अशी भूमिका आहे. कोंगरे यांच्याकडून राजीनामा देण्यासाठी विलंब होत असल्याने त्यांच्यावर दबाव वाढविण्यात आला. दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये बॅंक उपाध्यक्षांसह १६ संचालक उपस्थित होते. त्यांनी अविश्वास प्रस्ताव तयार करून त्यावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. दुपारपर्यंत निर्णय झाला नसता तर हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी होती. राजीनामा दिल्यामुळे ही प्रक्रिया थांबली. आता पुढील निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत उपाध्यक्षांकडे अध्यक्ष पदाचा प्रभार दिला जाणार आहे. अनुभवी उपाध्यक्ष म्हणून वसंत घुईखेडकर यांच्याकडे हा प्रभार राहणार आहे. यासाठी तीन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे.