मृत्यूलाही ‘किक’ मारणारा यवतमाळचा फुटबॉलपटू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:50 PM2018-07-06T21:50:57+5:302018-07-06T21:52:30+5:30
सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे.
नीलेश भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे. आईने दिलेली किडनी आणि मित्रांनी शस्त्रक्रियेसाठी दिलेला पैसा त्याच्यासाठी ‘चिअरिंग’ ठरला. अन् फुटबॉल खेळण्याच्या अतिव इच्छेमुळे त्याला मृत्यूला ‘पेनॉल्टी किक’ मारता आली. राज्य स्पर्धेत ‘बेस्ट डिफेन्स’चा पुरस्कार पटकाविणारा व विद्यापीठ स्तरीय स्पर्धा गाजविणारा हा खेळाडू आहे, यवतमाळ पोलीस दलातील कवायत निर्देशक निकेश रमेशचंद्र जयस्वाल!
सूरजनगरातील निकेश मोठा भाऊ सचिनचा खेळ पाहून शालेय जीवनापासून फुटबॉल खेळू लागला. १९९८ मध्ये राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर राज्यस्तरीय व अमरावती विद्यापीठ स्तरावर दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या निकेशने २००६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात स्पोर्ट्स कोट्यातून कॉन्स्टेबलची नोकरी मिळविली. त्याची पहिली नियुक्ती भंडाऱ्यात झाली. पोलीस प्रशिक्षणानंतर महाराष्ट्र स्टेट पोलीस गेमसाठी त्याला मुंबई येथे बोलाविण्यात आले. चार वर्षे त्याने या स्पर्धा गाजविल्या. दोन्ही पायांनी सारख्याच ताकदीने खेळणारा निकेश पोलीस स्पर्धांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. २०११ मध्ये ‘लोकमत’तर्फे आयोजित एनपीएल स्पर्धेत ‘सात्विक बुल्स नागपूर’ संघात तो खेळला. ही गाजलेली स्पर्धा सात्विक बुल्सनेच जिंकली, हे विशेष.
दरम्यान, दोन्ही किडणी निकामी झाल्यावर किडणी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. यासाठी १० ते १२ लाखांचा खर्च होता. पोलीस विभागाच्या आरोग्य कुटुंब कल्याण योजनेतून काही खर्च होणार होता. आई सविता जयस्वाल यांनी आपली एक किडणी मुलाला देण्याची तत्काळ तयारी दर्शविली. प्रश्न होता आॅपरेशनसाठी उर्वरित रक्कम जुळविण्याचा. त्यासाठी निकेशचे मित्रमंडळ धावून आले. नेहरु स्टेडियम येथील फुटबॉल खेळाडू, भंडारा पोलीस मित्र व यवतमाळ पोलीस दलाने पैसे गोळा करून मोठी रक्कम निकेशला दिली.
मुंबईत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हळूहळू सामान्य झाल्यावर निकेशमधील फुटबॉलपटू पुन्हा मैदानावर येण्यासाठी धडपडू लागला. दररोज फिरणे व जॉगिंग केल्यानंतर तो ज्येष्ठ फुटबॉलपटूंसोबत खेळू लागला. जिद्द व फुटबॉलचे वेड यामुळे तो आता स्पर्धाही खेळू लागला आहे. अमरावती, दारव्हा परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धा, वर्धा येथील स्पर्धेत त्याने भाग घेतला. आताही तो दररोज १ तास फुटबॉल खेळतो आणि उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शनही करतो.
डॉक्टर, मी पुन्हा खेळू शकेल का हो ?
फुटबॉलमध्ये निकेशची कारकीर्द उत्तरोत्तर बहरत होती. डिसेंबर २०१२ ला त्याचे लग्न झाले. २०१३ च्या डिसेंबरमध्ये चांदूररेल्वे येथे बंदोबस्तासाठी गेल्यावर निकेशला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तो धामणगाव येथील डॉक्टरांकडे गेला. रक्तदाब खूप वाढला होता. डॉक्टरांनी यवतमाळला खासगी दवाखान्यात ‘रेफर’ केले. येथील डॉक्टरांनी चाचण्या करून नागपूरला ‘रेफर’ केले. तेथे पुन्हा चाचण्या झाल्या अन् निकेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. हे कळताच एखाद्या रूग्णाने विचारले असते, मी वाचणार का? पण निकेशने एकच प्रश्न केला, ‘डॉक्टर, मी पुन्हा फुटबॉल खेळू शकेल का?’ फुटबॉल खेळावरील हे प्रेम पाहून डॉक्टरही अचंबित झाले.