यवतमाळ: पुसदचे चार तरुण निघाले सायकलने हज यात्रेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:18 PM2018-04-16T13:18:18+5:302018-04-16T13:18:27+5:30

पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत.

Yavatmal: four young men of Pusad going to Haj Yatra on bicycle | यवतमाळ: पुसदचे चार तरुण निघाले सायकलने हज यात्रेला

यवतमाळ: पुसदचे चार तरुण निघाले सायकलने हज यात्रेला

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात करणार सात हजार किलोमीटर प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क 

प्रकाश लामणे
यवतमाळ: पवित्र हज यात्रा आयुष्यात एकदा तरी करावी, अशी प्रत्येक मुस्लीम बांधवांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत असतो. याच प्रयत्नातून पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत.
इरफान खान महेबूब खान, दौलत खान नासीर खान, शेख अमजद शेख महंमद आणि शेक तौफिक शेख मुनाफ अशी या चार तरुणांची नावे आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता हे चार तरुण हजसाठी पुसदवरून रवाना झालेत. अमरावती, दिल्ली, बैतूल, पाकिस्तान, अफगानिस्तान, इराक, इरान असा प्रवास करीत ते सौदीअरेबियातील मक्का मदिना येथील हज यात्रेला पोहोचणार आहेत. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळात ते सायकल चालवित प्रवास करणार आहे. या तरुणांनी आपल्या सोबत केवळ पाणी, तीन ड्रेस, पासपोर्ट आणि सायकल दुरुस्तीचे साहित्य तेवढे घेतले आहे. सात हजार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल सहा महिन्याचा वेळ लागणार आहे. मिळेल तिथे भोजन आणि मिळेल तिथे मुक्काम करीत ही मंडळी हजचा प्रवास करणार आहे.
पुसदच्या पार्वतीनगरातील इरफान खान हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून इतर तीन जण खासगी वाहन चालक आहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते सायकलने हज यात्रेचा प्रवास करणार आहेत. महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी सायकलने निघणारे ते पहिलेच यात्रेकरू असावेत. हज यात्रेसाठी विजा आणि इतर कागदपत्रांसाठी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे हे चौघे सायकलनेच सात हजार किलोमीटरचा प्रवास करून पुसदला पोहोचणार आहे. वर्षभर सायकल प्रवास करून पवित्र हजची यात्रा करणार आहे.

तीन महिने सराव
या तरुणांनी अत्याधुनिक सायकली खरेदी केल्या. या सायकलने त्यांनी तब्बल तीन महिने सराव केला. नागपूर ते पुसद असे ते सराव करीत होते. या सरावातून त्यांना बळ मिळाले आणि हज यात्रेसाठी रवाना झाल्याचे पार्वतीनगर वॉर्डाचे नगरसेवक साकीब शाह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Yavatmal: four young men of Pusad going to Haj Yatra on bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.