यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

By admin | Published: April 18, 2016 04:43 AM2016-04-18T04:43:33+5:302016-04-18T04:43:33+5:30

उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला

Yavatmal gets water for three days | यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

यवतमाळला तीन दिवसाआड पाणी

Next

यवतमाळ : उन्हाच्या तीव्रतेने निळोणा जलाशयाची पातळी झपाट्याने घसरत असल्याने येत्या बुधवारपासून यवतमाळ शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत असून सोमवारी यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. बाराही महिने दोन दिवस आड पाणी मिळणाऱ्या यवतमाळकरांना आता आठवड्यातून दोनच दिवस पाणी मिळणार आहे.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात गत आठवड्यात सहा टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणी पुरेल असा जीवन प्राधिकरणाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र उष्णतेच्या तीव्र लाटेने हा जलसाठा झपाट्याने घटला. परिणामी जीवन प्राधिकरणावर मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाने तयारी चालविली आहे. दोन इर्मजन्सी पंप बसविण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत असलेले पंप चालविणे अवघड झाले आहे. पाणीसाठा पंपापर्यंत ओढण्यासाठी नाली खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणी पंपींग करून पाण्याचा उपसा केला जाणार आहे. सध्या पंपींग करताना प्राधिकरणाला दोन तास पंप बंद ठेवावा लागतो. सोमवारनंतर ही क्षमताही संपणार आहे. तत्पूर्वीच चाचणी घेऊन इर्मजन्सी पंप लावले जाणार आहे. दोनही पंपाच्या मदतीने दर तासाला सहा लाख ८० हजार लिटर पाणी खेचले जाणार आहे.
निळोणा प्रकल्पातील पाणी संपत आल्याने यवतमाळ शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठीची अंमलबजावणी बुधवार २० एप्रिलपासून केली जाणार आहे. सद्यस्थितीत चापडोह प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात पाण्यासाठी हाहाकार उडणार नाही, परंतु पावसाळ्यापर्यंतची तजवीज म्हणून जीवन प्राधिकरणाने तीन दिवसआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर तसेही यवतमाळकरांना दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. आता त्यात एका दिवसाची भर पडली. मात्र या एका दिवसाने आठवड्याला यवतमाळकरांना केवळ दोनच दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जीवन प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. (शहर वार्ताहर)

पावणेदोन कोटींचा वाढीव प्रस्ताव
४जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता. मात्र या कृती आराखड्यावर आमदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आता मूळ आराखड्याव्यतिरिक्त एक कोटी ७५ लाख रुपये वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सध्या तरी मंजुरी मिळाली नाही.

जिल्ह्यात १६ गावांना टँकर
यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून आता १६ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागत आहे. प्रारंभी दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु आता त्यात जांब, खरडगाव, घोडखिंडी, पांढरी, खरोला, उल्हासवाडी, म्हैसमाळ, पारवा, जामडोह, शिरोली, भांबराजा, उपवनवाडी, बोथा, फुलसावंगी, पेटूर, पाळोदी, सुधाकरनगर या गावांची भर पडली आहे.

२५ लघु प्रकल्पात ठणठणाट
उष्णतेच्या लाटेने जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सहा टक्के पाणी शिल्लक असून मध्यम प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव असे २५० सिंचन प्रकल्प कोरडे झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्येच ही अवस्था आहे तर मे महिन्यात काय होईल याचा विचार न केलेला बरा.

Web Title: Yavatmal gets water for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.