यवतमाळच्या पूर्वाने गाजविली होमलेस वर्ल्डकप स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:30 PM2017-11-24T14:30:13+5:302017-11-24T16:40:48+5:30

यवतमाळच्या एका १६ वर्षीय पूर्वा नीरज बोडलकरने ‘फोर अ साईड स्लम सॉकर’मध्ये (फुटबॉल) भारतीय संघात स्थान पटकावून वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भरारी घेतली. एवढेच नव्हे, तर आपल्या दमदार खेळाच्या भरवशावर तिने भारताला सातवे स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

Yavatmal girl wins Homelez World Cup Tournament | यवतमाळच्या पूर्वाने गाजविली होमलेस वर्ल्डकप स्पर्धा

यवतमाळच्या पूर्वाने गाजविली होमलेस वर्ल्डकप स्पर्धा

Next
ठळक मुद्देफोर अ साईड स्लम सॉकर जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारी जिल्ह्यातील पहिली महिलापूर्वाच्या कामगिरीने भारत सातव्या स्थानी

नीलेश भगत ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : फुटबॉल... जगातील सर्वात लोकप्रिय खेळ. या खेळात राज्य व राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडूंना प्रचंड परिश्रम व अडथळ्यांच्या शर्यतीतून जावे लागते. पुरुषांच्या गटाप्रमाणेच आता महिलांच्या गटातही ही शर्यत तीव्र झाली. अडथळ्यांच्या अशाच तीव्र शर्यतीतून यवतमाळच्या एका १६ वर्षीय मुलीने ‘फोर अ साईड स्लम सॉकर’मध्ये (फुटबॉल) भारतीय संघात स्थान पटकावून वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भरारी घेतली. एवढेच नव्हे, तर आपल्या दमदार खेळाच्या भरवशावर तिने भारताला सातवे स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ही षोड्स मुलगी आहे पूर्वा नीरज बोडलकर.
नार्वे देशाची राजधानी ओस्लो येथे सप्टेंबर महिन्यात फोर अ साईड होमलेस वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारतासह ५२ देशांच्या संघांनी सहभाग घेतला. भारतीय संघात यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पूर्वा बोडलकर या फुटबॉलपटूचा समावेश होता.
वाघापूर परिसरातील चैतन्यनगरीतील पूर्वाला फुटबॉलचा वारसा वडील व आजोबांकडून मिळाला. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना क्रीडा शिक्षक प्रवीण कळसकर यांनी तिला फुटबॉल खेळाकडे नेले. सुरूवातीला पूर्वा फुटबॉलसारखा मैदानी खेळ खेळायची, तेव्हा तिला समाजाकडून फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. मात्र आई-वडील व कुटुंब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे तिला फुटबॉल खेळात उत्तुंग भरारी घेता आली.
झोपडपट्टी फुटबॉल खेळात जागतिक स्तरावर कार्य करणारे नागपूरचे विजय बारसे व त्यांच्या क्रीडा विकास संस्थेबद्दल पूर्वाला तिच्या मैत्रिणींकडून माहिती मिळाली. ही संस्था गुणी असूनही संधी न मिळालेल्या खेळाडूंना फुटबॉल खेळात संधी निर्माण करून देण्यासाठी कार्य करते. क्रीडा विकास संस्थेचे कार्य करणारे वणी येथील अफरोज सर यांच्या ती संपर्कात आली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात पांढरकवडा येथे झालेल्या जिल्हा फुटबॉल स्पर्धेतून तिची अकोला येथील राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या बळावर पूर्वाची विदर्भ संघात निवड झाली. जानेवारी २०१७ मध्ये मुंबई येथे स्लम सॉकरच्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. त्यात पूर्वाने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाच्या भरवशावर तिची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. चार शिबिरानंतर पूर्वाची सर्वोत्कृष्ट आठ खेळाडूंत निवड झाली व त्यातून पुन्हा चार खेळाडूंची निवड होऊन त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले.
नार्वेची राजधानी ओस्लो येथील स्लम सॉकर वर्ल्ड कपमध्ये ५२ राष्ट्रांच्या संघाने सहभाग घेतला. स्पर्धेतील सहा ग्रुपपैकी भारताचा समावेश ‘बी’ ग्रुपमध्ये होता. या ग्रुपमध्ये इंग्लंड, फ्रान्स, मेक्सिको, नेदरलँड, आयर्लंड हे बलाढ्य संघ होते. लीग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत भारताने फ्रान्स, इंग्लंड या दोन संघांना पराभूत करीत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. भारत या ग्रुपमध्ये मेक्सिकोनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला.
इंग्लंड संघाचा भारताने ४ विरूद्ध ३ गोलने पराभव केला, तर फ्रान्स संघावर एका चुरशीच्या सामन्यात ४ विरूद्ध २ गोलने विजय संपादन केला. पूर्वाने या सामन्यात उत्कृष्ट खेळ करीत संघासाठी दोन गोल केले. या गोलच्या बळावर भारताने १५ वर्षानंतर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत सातवे स्थान पटकाविले. विशेष म्हणजे पूर्वा भारतीय संघातील वयाने सर्वात लहान खेळाडू होती.


जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विज्ञानमध्ये शिकणाºया पूर्वाने फुटबॉलमध्ये सहादा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यात दोनदा शालेय स्पर्धा, दोन वेळा पायका व सीबीएसई बोर्डच्या राष्ट्रीय स्पर्धा तिने गाजविल्या. या स्पर्धेत तिने एक सुवर्ण व दोन कास्य पदके पटकाविली. तिला भविष्यात फुटबॉल खेळातच करिअर करायचे असून फुटबॉलमध्ये एनआयएस करून कोच होण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. तिला प्रवीण कळसकर, जय मिरकुटे या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Yavatmal girl wins Homelez World Cup Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा