यवतमाळ : वादळात सापडलेल्या ‘पिंगळा’ला जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:34 PM2023-04-28T18:34:04+5:302023-04-28T18:34:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून वणी परिसरात वादळी पाऊस सुरू आहे. याचा फटका मानवांसह झाडांवर घरटी करून राहणाऱ्या पशुपक्षांनाही बसत आहे.
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : गेल्या काही दिवसांपासून वणी परिसरात वादळी पाऊस सुरू आहे. याचा फटका मानवांसह झाडांवर घरटी करून राहणाऱ्या पशुपक्षांनाही बसत आहे. गुरूवारी सायंकाळी या भागात सुरू असलेल्या वादळी पावसादरम्यान खाली पडून जखमी झालेल्या पिंगळा व हरीयाल पक्षाला पक्षीमित्रांनी जीवनदान दिले.
सायंकाळच्यावेळी वणी परिसरात अचानक वादळी पाऊस सुरू झाला. प्रचंड वादळ आणि त्यात पाऊस अशा परिस्थिती वणी पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका झाडावर बसून असलेला पिंगळा पक्षी व हरियाल पक्षी, हे दोनही पक्षी खाली पडून जखमी झाले. ही बाब लक्षात येताच, काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र हरिष कापसे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व माहिती दिली.
हरिष कापसे, अविनाश हिवलेकर व गजानन क्षीरसागर हे लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या दोनही पक्षाला सुरक्षित पकडून वणीतील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथे डॉ.प्रेरणा कनले, डॉ.पूनम नागपुरे, भरत चव्हाण, कुणाल कवरासे, अच्युत गोरे यांनी या पक्षांवर उपचार केले. प्रकृती ठणठणीत होताच, त्यांना सुरक्षितरित्या वणी परिसरातील जंगलात सोडण्यात आले.