यवतमाळ शासकीय रुग्णालयच पडलंय आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:11+5:30
एका परिचारिकेला ६० रुग्णांंना सांभाळावे लागते. यातील काहींची प्रकृती गंभीर असते. अशा वेळेस एकटी व्यक्ती सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही. यातून रुग्णांची हेळसांड होत आहे. कामाचा ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन बिघडले आहे. कक्ष सेवकांकडे तीन वाॅर्डांची जबाबदारी दिली आहे. ते कक्ष सेवक एकाही वाॅर्डात उपलब्ध होत नाहीत. त्यांना काम सांगितल्यास ऐकत नाहीत. रुग्णांच्या नातेवाइकालाच कामे करावी लागतात. त्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी केली जाते.
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयच गेल्या काही दिवसांपासून आजारी पडले आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळीच समस्या पाहायला मिळत आहे. प्रशासकीय समन्वय नसल्याने सहज सुटणाऱ्या समस्याही रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहेत. काही वाॅर्ड पूर्णत: रिकामे तर कुठे रुग्ण मावत नाहीत, असे चित्र आहे. रुग्णांच्या समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यासाठी कुणालाच सवड दिसत नाही.
सध्या डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. या रुग्णांसाठी लागणाऱ्या साध्या औषधीसुद्धा उपलब्ध नाहीत. रुग्णांना बाहेरून औषध आणण्याकरिता लिहून द्यायचे नाही, लिहून देणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते.
एका परिचारिकेला ६० रुग्णांंना सांभाळावे लागते. यातील काहींची प्रकृती गंभीर असते. अशा वेळेस एकटी व्यक्ती सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही. यातून रुग्णांची हेळसांड होत आहे. कामाचा ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन बिघडले आहे. कक्ष सेवकांकडे तीन वाॅर्डांची जबाबदारी दिली आहे. ते कक्ष सेवक एकाही वाॅर्डात उपलब्ध होत नाहीत. त्यांना काम सांगितल्यास ऐकत नाहीत. रुग्णांच्या नातेवाइकालाच कामे करावी लागतात. त्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी केली जाते.
एनआरएच अंतर्गत कार्यरत असलेल्या परिचारिकांना कामावरून कमी केले. रुग्णालयातील चार नर्स फीव्हर ओपीडी, लसीकरणासाठी गुंतलेल्या आहेत. कोविड वाॅर्डात सरासरी सात रुग्ण असून, त्यांच्यासाठी दहा नर्स ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नर्स नसल्याने रुग्ण व नर्सेसची ओढाताण होत आहे.
वाॅर्डात सकाळी साफसफाई केल्यानंतर दुपारी व सायंकाळी ती केली जात नाही. तब्बल २४ तासांनंतरच साफसफाई करतात. यामुळे रुग्णांची गर्दी वाढली असल्याने संडास, बाथरूम घाण होते. वाॅर्डातही कचरा पसरतो. १२ तासांत किमान तीन वेळा सफाई करणे अपेक्षित आहे. यामुळे रुग्णालयात दाखल राहूनच रुग्ण आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सर्जिकल आयसीयूमध्ये तुटक्या पलंगावर टेबलाचा टेकू लावून रुग्णाला ठेवले जात आहे. वाॅर्ड क्र. १९ जुन्या आयसीयूमध्ये डझनावर पलंग रिकामे पडून आहे. ते सर्जिकल आयसीयूत आणण्याची तसदीही प्रशासनाकडून घेतली जात नाही.
नाक-कान-घसा वाॅर्डामध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. तेथे दोन महिन्यांपूर्वीच ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली. पाईपलाईन पूर्ण झाली असूनही येथे ऑक्सिजन बेड नाही. व्हेन्टिलेटरही लावलेले नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना ठेवण्याची सोय नाही. स्त्रीराेग विभागातील तीनही वाॅर्ड भरलेले आहेत. बालरोग विभागाच्या वाॅर्डाची अशीच स्थिती आहे. एकीकडे वाॅर्डामध्ये रुग्ण वाढत असताना नेत्ररोग विभागाचा वाॅर्ड कुलूप लावून बंद केला आहे. नेत्ररोग विभागातील सर्व शस्त्रक्रिया बंद आहेत. त्या रुग्णांची परवड होत आहे.
उपचारात अडथळे
- जीवनावश्यक औषधांचा रुग्णालयात तुटवडा आहे. अशा स्थितीत उपचार कसे करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. हायड्रोकॅझोन, एव्हील, फ्रेसुमाईड, पाेटॅशियम क्लोराईड हे इंजेक्शन उपलब्ध नाही. सलाईनमध्ये डेक्स्ट्रा, सोडियम क्लोराईड, मेट्रो हेसुद्धा उपलब्ध नाही, प्राथमिक स्वरूपाची औषधी मागूनही वाॅर्डात पोहाेचविली जात नाही. वारंवार अर्ज-विनंत्या करूनही प्रतिसाद मिळत नाही. वारंवार लोकल खरेदीसाठी अर्ज करावे लागते.
महत्वाच्या चाचण्यांसाठी बाहेरचा रस्ता
- रुग्णालयात एलएफटीकेएफटी व लिक्वीड प्रोफाईल ही तपासणी अनेक दिवसांपासून बंद आहे. दहा वर्षापूर्वीची मशनरी त्यातही कामाचा प्रचंड ताण यामुळे ती मशीन सातत्याने बंद पडत असते. २०१८ मध्ये फुल्ली ऑटोॲनालायझर खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र ती झाली नाही. त्यामुळे तपासणीला बाहेर जावे लागत आहे.
- सोनोग्राफी, एक्स-रे व सीटी स्कॅन विभागात सर्वाधिक अनागोंदी असून यावर कोणाचेच नियंत्रण नाही. गरीब रुग्णांना चक्क दोन महिन्याचे वेटिंग दिले जाते. गंभीर रुग्णांसाठीसुद्धा येथे तपासणीची तत्परता दिसत नाही.