शिवरायांच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले
By admin | Published: February 20, 2017 01:21 AM2017-02-20T01:21:25+5:302017-02-20T01:21:25+5:30
घोड्यावर स्वार शिवराय, माथ्यावर टिळा, डोक्यावर भगवा फेटा, शिवरायांचा जयघोष करणारी प्रजा आणि गुलालाची उधळण करीत मराठमोळे नृत्य सादर करणाऱ्या..
शोभायात्रा : देखाव्यातून शिवकाळाला उजाळा
यवतमाळ : घोड्यावर स्वार शिवराय, माथ्यावर टिळा, डोक्यावर भगवा फेटा, शिवरायांचा जयघोष करणारी प्रजा आणि गुलालाची उधळण करीत मराठमोळे नृत्य सादर करणाऱ्या भगिनी हे दृश्य पाहून प्रत्येकाला शिवकाळात गेल्याचाच भास होत होता. निमित्त होते छत्रपती महोत्सवाचे.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेने यवतमाळकरांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत गेलेल्या या शोभायात्रेत शिवप्रेमी जनतेने सहभाग नोंदविला होता. तलवारबाजीच्या नृत्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते. मराठमोळा साज परिधान करून मराठी नृत्य ठिकठिकाणी सादर केले. शिवकाळातील विविध घटना रेखांकित करण्यासाठी विविध झाँक्या साकारण्यात आल्या होत्या. यामधील आकर्षक वेशभूषेने ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला होता. यातून शिवकाळात वावरत असल्याचाच भास निर्माण झाला.
या शोभायात्रेचे शहरातील विविध भागात जंगी स्वागत झाले. शोभायात्रेच्या स्वागताकरिता शहरातील विविध चौकात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. विविध ठिकाणी पाण्यासोबत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिवजयंतीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. (शहर वार्ताहर)