यवतमाळ जिल्ह्यात चार बालविवाह रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:36 PM2018-03-30T16:36:59+5:302018-03-30T16:37:13+5:30
यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अज्ञान, रुढी परंपरा आदी कारणांनी बालविवाहाची कुप्रथा आजही काही भागात सुरू आहे. शासन बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी छुप्या पद्धतीने असे विवाह होत आहे. असेच यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.
जिल्ह्यातील पिसगाव (मारेगाव), हेगडी (पुसद), भंडारी (आर्णी) आणि सावंगा (दिग्रस) येथे होऊ घातलेले बालविवाह पालकांचे मन वळवून थांबविण्यात आले. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचीही मदत घेण्यात आली. १८ वर्षाखालील मुलीचा आणि २१ वर्षातील मुलाचा विवाह करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. मात्र आजही काही समाजात बालविवाह करण्याची प्रथा कायम आहे. अज्ञान, रुढी परंपरा, अंधश्रद्धा आणि जोखीम यातून बालपणीच विवाह उरकले जातात. भटकंती करणाऱ्या समाजात मुलगी वयात आली की, तिचा विवाह उरकण्याची घाई होते. १३-१४ वर्षाची कोवळी पोरं विवाह बंधनात अडकून १६-१७ व्या वर्षी तिच्यावर मातृत्वही लादले जाते. अनेक कोवळ्या कळ्या अशा विवाहाने निस्तेज झाल्या आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने यासाठी प्रयत्न करीत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे होऊ घातलेला बालविवाह स्थानिक प्रशासन आणि कक्षाने रोखला. तसेच पुसद तालुक्यातील हेगडी, आर्णी तालुक्यातील भंडारी आणि दिग्रस तालुक्यातील सावंगा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
समुपदेशनात लागतो कस
बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली की, बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी त्या गावात पोहोचतात. कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा यांची समजूत काढतात. परंतु वर्षानुवर्षे असलेला पगडा जायला कठीण जाते. समुपदेशकांचाही कस लागतो. अनेकदा पोलिसी खाक्या आणि भीती दाखवून हा विवाह रोखला जातो. तसेच यानंतर बालविवाह करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले जाते.
प्रगतीशील महाराष्ट्रात बालविवाह होणे ही शरमेची बाब आहे. शासन असे विवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे माहिती प्राप्त होताच पडताळणी करून खात्री केली जाते. त्यानंतर त्या कुटुंबाचे समूपदेशन करून हा विवाह रोखला जातो. असे विवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण समिती अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- रवी आडे
जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, यवतमाळ.