ती लग्नापूर्वीच ठरली उष्माघाताचा बळी, विवाहापूर्वीचे देवदर्शन उठले जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 07:31 PM2019-05-01T19:31:52+5:302019-05-01T19:41:23+5:30
जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. आग ओकणारे सूर्यतेज ४६ डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात करीत आहे.
यवतमाळ - जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. आग ओकणारे सुर्यतेज ४६ डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात करीत आहे. त्यामुळे मानवी जीवन कमालीचे विस्कळीत झालेले आहे. घराबाहेरील कामे दिवसा करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे दिवसा शहरातील रस्ते कमालीचे स्तब्ध झालेले दिसत आहे.
अशा दिवसात बाहेर देवदर्शनाला जाने एका उपवर मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले. आर्णी तालुक्यातील भंडारी (जहागीर) येथील रघुनाथ शिंदे यांची मुलगी कु. कल्पना हिचा विवाह तालुक्यातील परसोडा येथील अनिल सोळंके या मुलाशी सामाजीक रितीरिवाजाप्रमाणे ठरला. मार्च महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. दिवाळी नंतर २० फेब्रुवारी २० रोजी लग्नाची तारीख निश्चित झाली.
त्यांच्या सामाजीक परंपरे नुसार मुलीचे लग्न जुळल्यावर देवकार्य पार पाडण्यासाठी कुळदैवताच्या पायथ्याशी जावे लागते. त्यामुळे ता. २५ एप्रिल रोजी खाजगी गाडी करून उपवर मुलगी व सोबत आई वडील, काका काकु, दोन भाऊ, आजी व विवाह समंध जुळवणारे सिध्दु महाराज शिंदे हे कोल्हापूर, जेजुरी, नातेपोते, नाथबाबा येथे गेले होते. उपवर मुलीचे लग्नापूर्वीचे दैविक कार्य आटोपून घरी परत येत असतानांच कल्पनाला उनं लागली. तीला उलट्या येऊ लागल्या म्हणून तुळजापूर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करून उपचार करून घराकडे निघाले. प्रवासात तीचा त्रास वाढला. तेव्हा नांदेड पोहचले होते.
तिला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तीथे उपचार केला परंतु उष्माघाताचा आघात जास्त असल्यामुळे तीच्यावर उपचार होऊ शकला नाही. अखेर तिला मरणाने कवटाळले. ३० एप्रिल रोजी सकाळी चार वाचता प्रवासादरम्यान तीचा मृत्यू झाला. देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलिचा उष्माघाताने बळी घेतला. ही तालुक्यातील पहिली घटना घडली. या घटनेमुळे कल्पना व अनिल यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन जीवाच्या मनोमिलनाला नियतीने पोरकेच ठेवले. ही घटना परिसरातील नागरिकांच्या मनाला हळहळ व्यक्त करनारी ठरली. तर उपवर अनिलला कायम दुखा:त झोकुन गेली.