यवतमाळ भूमीला दाद अन् कलावंतांना साद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:33 PM2018-11-25T23:33:55+5:302018-11-25T23:34:31+5:30
अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली. विशेष म्हणजे, एका चिमुकल्या मुलीचे गायन चक्क त्यांनी मोबाईलमध्ये ‘शूट’ करून सोबत नेले.
निमित्त होते बाबूजींच्या एकवीसाव्या स्मृतिसमारोहाचे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीसमारोहानिमित्त शनिवारी सायंकाळी राहुल देशपांडे यांचा ‘स्वरांजली’ कार्यक्रम येथील प्रेरणास्थळावर पार पडला.
त्यावेळी शास्त्रीय रचना पेश करता-करता स्वरसम्राट राहुल देशपांडे यांनी यवतमाळकर रसिकांशी मोकळा संवादही साधला. ते म्हणाले, शास्त्रीय संगीत हे भारताचे वैभव आहे. मी त्याचा एक घटक असल्याचा मला अभिमान आहे. नव्या पिढीलाही भारतीय शास्त्रीय संगीताची माहिती असलीच पाहिजे. या कार्यक्रमापूर्वी यवतमाळच्या शुभलक्ष्मी प्रसाद कुळकर्णी या मुलीचे गायन मी ऐकले. तिचे गायन ताकदीचे आहे. माझे तिला आवाहन आहे, तिला आणि तिच्यासारख्या अनेक मुलांना शास्त्रीय संगीत शिकवायला मी तयार आहे. त्यासाठी मी एक पैसाही घेणार नाही. माझ्या गुरुजींनीही माझ्याकडून कधी पैसे घेतले नाही. पण यवतमाळातच असे गुरू तयार झाले पाहिजेत. एखाद्या मुलाने शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त केली की लगेच या गुरुंची नावे सांगता आली पाहिजेत.
ते म्हणाले, विदर्भ मला माझ्या घरासारखेच वाटते. माझे आजोबा (प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे) यांचे मूळ गाव मूर्तिजापूर. नंतर ते अमरावती जिल्ह्यात पूर्णानगरनजीकच्या मार्की येथे स्थायिक झाले. पुढे नागपूरमध्ये गेले. तेथून त्यांना लाहोरला जावे लागले होते. लाहोरमधून पुन्हा ते नागपुरातच परतले होते आणि नंतर पुण्याला स्थायिक झाले. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा विदर्भात येतो, तेव्हा आपल्या गावाच्या पंचक्रोशीत आल्यासारखा आपलेपणा वाटतो.
बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळाविषयी राहुल देशपांडे म्हणाले, मी स्मारके अनेक पाहिली पण असे स्मारक पहिल्यांदाच बघता आले. कार्यक्रमापूर्वी मी हा संपूर्ण परिसर फिरून पाहिला. तेव्हा असे वाटले जणू मी युरोपातच फिरतोय! प्रत्येक गोष्टीची येथे छान मांडणी आहे. विशेष म्हणजे स्वरांजली कार्यक्रमानंतर राहुल देशपांडे यांनी प्रेरणास्थळावर वृक्षारोपणही केले.
शंकरराव सांगळे यांचे स्मरण
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘स्वरांजली’ मैफल सुरू होण्यापूर्वी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी प्राचार्य शंकरराव सांगळे यांचेही आवर्जुन स्मरण केले. ते म्हणाले, बाबूजींना जाऊन २१ वर्षे झाली. त्यांच्या प्रत्येक स्मृतिसमारोहाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे प्राचार्य शंकरराव सांगळे यांचे नुकतेच निधन झाले. विजय दर्डा यांनी उपस्थितांना आवाहन करताच शेकडो उपस्थितांनी उभे राहून शंकरराव सांगळे यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चिफ तथा माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, संचालक करण दर्डा, उषाताई दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते.