यवतमाळ ‘मेडिकल’चे रेमडेसिविर काळ्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:00 AM2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:02+5:30
शासकीय काेविड रुग्णालयात पावडर स्वरूपात रेमडेसिविर इंजेक्शन येते. त्यात लिक्विड मिसळून ते व्हायल तयार केले जाते. शिवाय यातील मुख्य आराेपी साैरभ माेगरकर याने कबुली दिल्यावरून शासकीय काेविड रुग्णालयात कार्यतर असलेल्या पूनम चाेखाराम मेश्राम या कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. तिच्याकडून आणखी काय माहिती मिळते याचा शाेध पाेलीस घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जप्त केलेल्या रेमडेसिविरच्या नऊ व्हायलपैकी तीन व्हायल शासकीय काेविड रुग्णालयातील असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णाला देण्यासाठी असलेले इंजेक्शन थेट काळ्या बाजारात विक्री हाेत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू हाेती. पाेलीस कारवाईने हा प्रकार उघड झाला आहे. यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय काेविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणखी एका कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शासकीय काेविड रुग्णालयात पावडर स्वरूपात रेमडेसिविर इंजेक्शन येते. त्यात लिक्विड मिसळून ते व्हायल तयार केले जाते. शिवाय यातील मुख्य आराेपी साैरभ माेगरकर याने कबुली दिल्यावरून शासकीय काेविड रुग्णालयात कार्यतर असलेल्या पूनम चाेखाराम मेश्राम या कंत्राटी परिचारिकेला पाेलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. तिच्याकडून आणखी काय माहिती मिळते याचा शाेध पाेलीस घेत आहे. कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी शासकीय कोविड रुग्णालयाचाच आधार घेतो. मोठ्या विश्वासाने रुग्णाचे नातेवाईकही रुग्णाला तेथे दाखल करतात. उपचार सुरू असेपर्यंत रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्यात संवादही होत नाही. अशा विश्वासाला तडा देण्याचे काम रेमडेसिविर व्हायल चोरी प्रकरणातून झाले आहे. अडचणीच्या काळात दानदात्यांनी रुग्णांचा जीव वाचावा यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी मदतीचा हात दिला होता. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणेत काही महाभाग असे माणुसकीला काळीमा फासण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांचा अत्यावश्यक डोस त्याला न देता त्याची बाजारात विक्री करणे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. अटक केलेल्या नर्सने १५ व्हायलची कबुली पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे.
शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे गूढ उकलले
शासकीय काेविड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा दर सर्वाधिक आहे. याबाबत वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडून विचारणा झाली. प्रत्येक वेळी वेगवेगळे उत्तर दिले जात हाेते. दाखल रुग्णांना आवश्यक औषधाचे डाेस न देता त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळेच काेविड रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने असे गंभीर प्रकार येथे हाेत आहेत.
तीन आराेपी पाेलीस काेठडीत
पाेलिसांनी अटक केलेल्या पाच आराेपींना रविवारी न्यायालयात हजर केले. यात डाॅ. अक्षय तुंडलवार, सावन पवार, साैरभ माेगरकर या तिघांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली, तर बिलकीस बानाे व तिची गर्भवती मुलगी शबाना अन्सारी यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली. तपास अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी आराेपींचा तीन दिवसांचा रिमांड मागितला हाेता.