यवतमाळ एमआयडीसीत पट्टेदार वाघाचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:44 PM2019-06-17T22:44:42+5:302019-06-17T22:44:52+5:30
शहरालगतचा एमआयडीसी परिसरात मागील महिनाभऱ्यापासून पट्टेदार वाघिणीने ठिय्या मांडला आहे. या भागात हमखास वाघिणीच्या पायाचे ठसे दिसून येतात. शहराच्या अगदी जवळ असलेल्या भागात वाघ आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळपास दहा ट्रॅप कॅमेरे व मचानी बांधण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगतचा एमआयडीसी परिसरात मागील महिनाभऱ्यापासून पट्टेदार वाघिणीने ठिय्या मांडला आहे. या भागात हमखास वाघिणीच्या पायाचे ठसे दिसून येतात. शहराच्या अगदी जवळ असलेल्या भागात वाघ आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळपास दहा ट्रॅप कॅमेरे व मचानी बांधण्यात आल्या आहे.
पट्टेदार वाघ असल्याची चर्चा मागील सहा महिन्यापासून लासीना, पिंपरी, चिंचबर्डी, कामनदेव, उमर्डा नर्सरी परिसरात होती. पिंपरी येथे वाघाने बैल, कुत्रा व एक वगार याची शिकार केल्याचीही माहिती चार महिन्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी दिली. काहींना या वाघाचे दर्शनही झाले. मात्र वन विभाग ठोस पुराव्याअभावी वाघ आहे हे मान्य करण्यास तयार नव्हता. शिकार केलेल्या ठिकाणी काही पुरावेही वन विभागाला मिळाले नव्हते. यामुळे ग्रामस्थांनी कितीही आर्जव करून सांगितले तरी वन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत होती. आता या परिसरात फिरणारा वाघ असल्याचे वन विभागाच्या लेखी स्पष्ट झाले आहे. थेट ट्रॅप कॅमेºयात हा वाघ कैद झाला आहे. शिवाय तिच्या पगमार्कवरून वाघ असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र वन विभागाची यंत्रणा याबाबत अतिशय गुप्तता बाळगून आहे.
एमआयडीसीतील एका इंग्रजी शाळेच्या मागे कांजीभाई गलमानी यांचे शेत आहे. या शेतात ऊस व केळीचा बगीचा आहे. या उसातच वाघा डेरा असल्याचे सांगण्यात येते. या भागात वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे. येथे काही ठिकाणी पगमार्कही आढळून आले आहे. वाघाला जेरबंद करून तिच्या अधिवास क्षेत्रात सोडण्याचा होत आहे. तुर्त वनविभाग वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. यवतमाळ शहरालगतच वाघ आल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान
शेतात वाघ असल्याचे सर्वप्रथम १० मे रोजी स्पष्ट झाले. शेतात काम करणारा गडी पांडूरंग याला वाघ दिसला. त्याने याची माहिती वन विभागाच्या यंत्रणेला दिली. त्यानंतर वन विभागाने सावकाश हालचाल सुरू केली. अनेकदा चकरा घातल्यानंतर या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले, पगमार्क घेतले. दरम्यान ३ जून रोजी हा वघा ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. त्यानंतर वनविभागाने येथे लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. मात्र या सर्व घडामोडीत कांजीभाई गलमानी याचा लाखो रुपयांचा ऊस व केळी सुकत आहे. सिंचनासाठी शेतात कोणीच कामाला येण्यास तयार नाही. कडाक्याच्या उन्हात वाघामुळे हाती आलेले पीक सुकून जात आहे. वनविभागाने भरपाई द्यावी अथवा वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कांजीभाई यांनी केली आहे.