अल्पवयीन मुलीवर अत्याचार, निषेधार्थ आर्णी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:06 PM2018-10-11T14:06:02+5:302018-10-11T14:06:37+5:30
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने दबाव टाकून गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (11 ऑक्टोबर) आर्णीकरांनी बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेला.
यवतमाळ : आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने दबाव टाकून गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (11 ऑक्टोबर) आर्णीकरांनी बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेला. जलदगती न्यायालयाअंतर्गत हे प्रकरण चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी मोर्चेक-यांनी केली. आर्णी येथे एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला.
या अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला. नंतर एका टोळक्याने सदर मुलीचे गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. याबाबत मुलीच्या पित्याने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाची माहिती मिळताच आर्णीकरांनी संताप व्यक्त केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेकडो आर्णीकर आर्णी पोलीस ठाण्यावर धडकले. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद होती. यानंतर शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्यावर धडकला. तेथे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
त्यातून या लैंगिक अत्याचारातील आरोपींना त्वरित अटक करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. सोबतच शहरातील शाळा व कॉलेज समोर वेळोवेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा, शिवनेरी चौकातील आॅटो पॉर्इंट त्वरित हटवावा, रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करावा, वाढत्या चिडीमारीला आळा घालावा आदी मागण्या करण्यात आल्या. अन्यायग्रस्त पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आमदार ख्वाजा बेग यांच्यासह नागरिकांनी दिला.