स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ पालिकेची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:48 IST2019-03-06T23:48:11+5:302019-03-06T23:48:30+5:30
देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचा हा परिणाम आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ पालिकेची मोहोर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचा हा परिणाम आहे.
स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत एकूण चार मुद्यांवर गुणांकन करण्यात आले. यामध्ये पहिल्या भागात सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस म्हणजेच पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आहे. यामध्ये यवतमाळला १२५० पैकी ४१४ गुण मिळाले. स्वच्छतेच्या सेवा कोणत्या देतो, सार्वजनिक शौचालय, झोपडपट्ट्या, शहरातील रस्ते, त्यावरचे पथदिवे यांचा समावेश सेवेअंतर्गत येतो. दुसरा मुद्दा हा सर्टिफिकेशनचा होता. यात ५०० गुण मिळाले. शहरासंदर्भातील योग्य व परिपूर्ण माहिती, कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, त्याला असलेला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद, पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा या उपक्रमांचे जीपीएस टॅगिंगद्वारे फोटो काढणे अशा मुद्यांवर गुणांकन झाले. तिसरा मुद्दा हा डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन प्रत्यक्ष पाहणी करणे, शहराला राज्य आणि केंद्रातील पथकांनी दोन वेळा भेटी दिल्या. स्वच्छतेच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. यात ९९७ गुण मिळाले. तर स्वच्छता अॅपच्या वापराबाबत ९७६ गुण मिळाले. यामध्ये नागरिकांचे अभिप्रायही घेण्यात आले. एकंदरच नगरपरिषदेच्या यंत्रणेने सलग चार महिने अहोरात्र राबून देशपातळीवर स्वच्छतेचे मानांकन मिळविले आहे. पहिल्या शंभरमध्ये येण्याचा बहुमानही भूषणावहच असल्याचे सांगण्यात येते.
चार मुद्यांवर गुणांकन
पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, शहराची परिपूर्ण माहिती, डायरेक्ट आॅब्झर्व्हेशन, स्वच्छता अॅप अशा चार मुद्यांवर केंद्र व राज्य पथकाच्या चमूने गुणांकन केले.