गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात यवतमाळ पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:16 PM2019-07-27T12:16:37+5:302019-07-27T12:17:48+5:30

अनोळखींची ओळख पटविणाऱ्या, गुन्हेगारी जगतातील सदस्यांची कुंडली जुळविणाऱ्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्य पोलीस दलात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

Yavatmal police in number one in the state to match the horoscope of criminals | गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात यवतमाळ पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात यवतमाळ पोलीस राज्यात पहिल्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्दे‘सीसीटीएनएस’ प्रणालीचे वार्षिक गुणांकन जारी सोलापूर दुसऱ्या, तर कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर पुणे-ठाणे माघारले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनोळखींची ओळख पटविणाऱ्या, गुन्हेगारी जगतातील सदस्यांची कुंडली जुळविणाऱ्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्य पोलीस दलात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स) प्रणालीच्या कनेक्टीव्हिटी, अंमलबजावणी व उपलब्धीचे राज्यभरातील वार्षिक (जून २०१८ ते जून २०१९) मूल्यमापन करण्यात आले. त्याची गुणांकन यादी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी शुक्रवारी २६ जुलै रोजी जारी केले. या गुणांकनात एकूण १८२ पैकी सर्वाधिक १७४ गुण यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने मिळविले आहेत. यवतमाळने राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. १७१ गुणांसह सोलापूर ग्रामीण पोलीस दल दुसऱ्या, तर १६७ गुणांसह कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी पुणे ग्रामीण (७९), पिंपरी चिचवड (६६) व ठाणे शहर (६५) हे राज्यात शेवटच्या तीन स्थानावर राहिले आहे.
सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून पोलीस दलाला गतिमान करण्याचा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आणि अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोरदार साथ दिल्याचे राज्यात सर्वाधिक मिळालेल्या गुणांवरून स्पष्ट होते. सीसीटीएनएस प्रणालीमध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाला मिळालेले हे यश मोठी उपलब्धी मानली जाते. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सुरुवातीला स्टेशन डायरी एन्ट्री, एफआयआर नोंदविणे सुरू होते. त्यात आता दैनंदिन न्यायालयाचे होणारे निर्णय, शिक्षा, निर्दोष मुक्तता, दोषारोपपत्र यालासुद्धा या प्रणालीमध्ये जोडण्यात आले आहे. यापुढे प्रतिबंधात्मक कारवाई व अन्य कामगिरीही या प्रणालीवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे, शाखा व पोलीस कार्यालयांना सीसीटीएनएस प्रणालीने जोडण्यात आले आहे. अधिकाधिक कामकाज या प्रणालीद्वारे करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो.

कामगिरीत सुधारणा अपेक्षित - कुलकर्णी
राज्यातील सर्व घटक प्रमुखांनी सीसीटीएनएस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर होईल, गुन्हे प्रकटीकरण व प्रतिबंध करण्यासाठी त्याची मदत होईल यादृष्टीने जातीने लक्ष घालावे, असे निर्देश सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिले आहे. सिटीझन पोर्टलवरून प्राप्त तक्रार अर्जांची १०० टक्के निर्गती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ओळख पटविणे सोपे
सीसीटीएनएस प्रणालीमुळे बेवारस वाहन, मृतदेह यांची ओळख पटविणे सोपे झाले आहे. वाहन चोरी झाले असेल तर त्याचे चेचिस क्रमांक व अन्य माहिती या प्रणालीवर नोेंदविल्यास ते वाहन नेमके कुठले हे स्पष्ट होते. एखादा मृतदेह सापडला असेल तर कुठे हरविल्याची नोंद असल्यास ओळख पटविणे सहज शक्य होते. या प्रणालीच्या ‘गुडवर्क’मध्ये याचा समावेश होतो.

‘सीसीटीएनएस’ प्रणालीत राज्यात पहिल्या क्रमांकाचे मिळालेले रेटींग यवतमाळ जिल्हा पोलीस दलासाठी मोठी उपलब्धी आहे. पोलीस दलाचे १०० टक्के कामकाज या प्रणालीद्वारे पूर्ण करून रेटींगमध्ये आणखी वरचा क्रमांक गाठण्याचा प्रयत्न राहील.
- एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ

Web Title: Yavatmal police in number one in the state to match the horoscope of criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस