कोट्यवधींच्या खनिज विकास निधीवर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचा डल्ला; किशोर तिवारींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 05:15 PM2021-12-14T17:15:59+5:302021-12-14T17:34:41+5:30
जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.
यवतमाळ :प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याकरिता मिळणाऱ्या ३०० कोटी रुपयांच्या खनिज विकास निधीवर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ताव मारला असून, यामुळेच वणी, मारेगाव व झरी या भागात प्रदूषणाने कहर केला आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.
किशोर तिवारी यांनी वणी उपविभागात दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी येथील खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
या भागात अनियंत्रित खनिज उत्खनन सुरू असल्यामुळे हरीत लवादाने घातलेल्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना-हरकत देताना टाकलेल्या सर्व शर्ती धाब्यावर बसवून कोळसा, गिट्टी, डोलामाईटचे उत्खनन सुरू आहे. बेकायदेशीररीत्या कोळसा काढणे, राजकीय नेते, अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रास लूट सुरू असून, कोळशाची अनधिकृत कोळसा डेपोत विल्हेवाट लावणे, असे गंभीर प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.
वाढलेल्या प्रदूषणामुळे वणी, झरी व मारेगावातील ६५७ खेड्यांतील शेतकरी, ग्रामस्थांचे जीवन असुरक्षित झाले आहे. प्रदूषणामुळे या ग्रामस्थांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासह विविध उपाययोजनांसाठी आरोग्य, वनविभाग यांना प्रत्येक वर्षी सुमारे ३०० कोटींचा खनिज विकास निधी मिळतो. परंतु यातील अर्ध्यापेक्षा अधिक निधी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लुटल्याचाही आरोप तिवारी यांनी केला.
७ वर्षांत मिळालेल्या या निधीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला भूमिगत खाणींमधून कोळसा काढण्यात येत होता. गरजेनुसार नंतर खुल्या कोळसा खाणींचा पर्याय स्वीकारण्यात आला. हे करताना प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक होते. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्रदूषण वाढून नागरी जीवन धोक्यात आल्याचे ते म्हणाले.
घरांची पडझड; नुकसानभरपाई नाही
उत्खननासाठीच्या स्फोटामुळे गावखेड्यातील घरांची पडझड झाली आहे. त्याची नुकसानभरपाईदेखील दिली जात नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत दोन कृती आराखडे तयार करण्यात आले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. कोळसा चोरी व इतर खनिज उपसा, अवैध साठा व त्याची अवैध वाहतूक यामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये वणी शहराचे नाव जोडले जाणार आहे. खनिज विकास निधीत होणारा भ्रष्टाचार व त्यातून निर्माण झालेले प्रदूषण, याचा आढावा घेण्यासाठी वणी भागात दौरा करून पाहणी केली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करण्यात येईल.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन