यवतमाळ प्रिमीअर लिग -२०१४
By Admin | Published: November 6, 2014 11:03 PM2014-11-06T23:03:26+5:302014-11-06T23:03:26+5:30
शालेय विद्यार्थ्यांना आपले क्रीडा गुण सादर करता यावे, यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने विशेष पुढाकार घेत ‘यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४’ ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
‘वायपीएस’चे क्रिकेटला प्रोत्साहन : स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन
यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांना आपले क्रीडा गुण सादर करता यावे, यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने विशेष पुढाकार घेत ‘यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४’ ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत येथील पोस्टल मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदविला आहे.
दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या सामन्याकरिता विविध आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघाला रोख २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्या संघाला ११ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास ५०० रुपये तर मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजांना तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
या सामन्याच्या आयोजनासाठी ‘वायपीएस’ शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असल्याची बाब लक्षात घेत त्यांनी या सामन्यासाठी सर्वोपरी सहकार्य केले आहे. प्राचार्य जेकब दास यांचीही भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांचे या स्पर्धेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. स्पर्धेचे पंच म्हणून कुमार चौधरी, आशिष तोटे, हेमंत देवबंसी, गौरव शुक्ला, सचिन भोयर, रोहित रॉय हे काम पाहणार आहे. या सामन्याचे मुख्य समन्वयक यश बोरुंदिया, सहसमन्वयक प्रवीण कळसकर, अभिषेक गुजर आहेत. शालेय विद्यार्थ्यांमधील क्रिकेट खेळाबद्दलची रुची लक्षात घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयानेही स्पर्धेसाठी पोस्टल मैदान उपलब्ध करून दिले. याबद्दल आयोजकांनी आभार मानले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माणिक विंगेट, विनायक गायकवाड, रमाकांत कौशिक, अजय गायकवाड, पराग पिंगळे, कुमार चौधरी, आशिष काळे, विवेक भोयर, अमोल चन्नूरवार, अमोल क्षीरसागर, उमेश कर्णेवार, उमाकांत रोडे, अभिजित भीष्म, शैलेंद्र चपेरिया, दिनेश जयस्वाल आदी पुढाकार घेत आहे. (वार्ताहर)