यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:29 PM2018-12-10T14:29:36+5:302018-12-10T14:31:46+5:30
नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे.
नेर (यवतमाळ) : नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनेही जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला गेल्यावेळी पेक्षा दोन जागा कमी मिळाल्या आहेत. नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात शिवसेनेला ९, काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला तीन तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या.
नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता पवन जयस्वाल विजयी झाल्या. त्यांना आठ हजार १२३ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. शबाना यांना पाच हजार ११९ मते प्राप्त झाली. जवळपास तीन हजार मतांच्या फरकाने जयस्वाल विजयी झाल्या.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला केवळ एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. अपक्षांनीही दोन जागा पटकाविल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या जागा दोनने घटल्या आहे. अपक्षांची संख्या कायम आहे. मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये तीनची भर पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेचा फटका बसला आहे. तथापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने यावेळी मुसंडी मारत दोन जागा जादा पटकावल्या आहे.