Yavatmal : टेट पास झालात? यवतमाळात ५१९ जागा तुमच्यासाठीच! अनुदानित शाळांची संचमान्यता आली
By अविनाश साबापुरे | Published: August 3, 2023 07:29 PM2023-08-03T19:29:07+5:302023-08-03T19:29:40+5:30
Yavatmal: बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ - बीएड धारकांनो, तुम्ही टेट परीक्षा पास झाला असाल तर ही खुशखबर तुमच्यासाठीच आहे. जिल्ह्यातील अनुदानित शाळांच्या संचमान्यता झाल्या असून त्यात तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे केवळ १५६ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. त्यामुळे समायोजनानंतरही बेरोजगारांच्या भरतीसाठी जवळपास पाचशे जागा उपलब्ध होणार आहेत.
२०२२-२३ या शैक्षणिक सत्राची शिक्षक संचमान्यता शिक्षणाधिकाऱ्यांच्या लाॅगीनला आली असून आता संबंधित शाळांपर्यंत संचमान्यता पोहोचविण्यात आली आहे. या संचमान्यतेच्या गोषवाऱ्यानुसार, जिल्ह्यातील १९५ खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या तब्बल ५१९ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. तर ८७ शाळांमध्ये १५६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठवून अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम संस्थेंतर्गत समायोजन करण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही उरणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची माहिती जिल्हा स्तरावर पाठविण्याची सूचना केली आहे. परंतु, या दीडशे शिक्षकांचे समायोजन झाल्यावरही पवित्र पोर्टलद्वारे पदभरतीसाठी जवळपास पाचशे जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अभियोग्य परीक्षा दिलेल्या बीएडधारक उमेदवारांसाठी संधी चालून येणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती रिक्त आणि अतिरिक्त
तालुका : रिक्त : अतिरिक्त
आर्णी : ६६ : ०७
बाभूळगाव : १३ : ०९
दारव्हा : ४० : ०९
दिग्रस : २९ : ०४
घाटंजी : ३५ : १०
कळंब : ३५ : ०५
महागाव : ३२ : ०७
मारेगाव : २० : ०९
नेर : २९ : ०८
पांढरकवडा : २१ : १०
पुसद : ६३ : ११
राळेगाव : १३ : २४
उमरखेड : ३७ : ०३
वणी : २७ : १८
यवतमाळ : ४५ : १७
झरी : ०५ : ०५
जागा आणखी वाढणार
ज्या शाळांमधील ८५ टक्के पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले, त्याच शाळांच्या संचमान्यता अंतिम करण्यात आल्या आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी काही शाळांच्या संचमान्यता येऊन रिक्त आणि अतिरिक्त या दोन्हींचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा, आश्रमशाळा आदींमधील रिक्त जागांचा आकडाही यात मोठी भर घालणार आहे.
रिक्त जागांचा तपशील
- मुख्याध्यापक : ०४
- उपमुख्याध्यापक : ०१
- अधीक्षक : १८
- प्राथमिक शिक्षक : ४०
- उच्च प्राथमिक शिक्षक : २२८
- माध्यमिक शिक्षक : २३२
सात शाळांना बंदची नोटीस, तर सहा शाळांना ‘सेल्फफायनांन्स’ची नोटीस
दरम्यान २०२२-२३ च्या यूडायस माहितीनुसार जिल्ह्यात सात शाळांमध्ये २० पेक्षा कमी पट संख्या आढळली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना नोटीस बजावली असून शाळा बंद का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. ठराविक काळात समाधानकारक खुलास प्राप्त न झाल्यास या शाळा बंद करण्याची तंबीही देण्यात आली आहे. यामध्ये केळापूर तालुका, उमरखेड तालुका, वणी तालुक्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. तर यवतमाळ तालुक्यातील चार शाळांचा समावेश आहे. तसेच निकषांचे पालन न करणाऱ्या सहा विनाअनुदानित शाळांना ‘स्वयंअर्थसहायित’ शाळा घोषित करण्याबाबतही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन, पुसदमधील एक, मारेगावमधील एक आणि यवतमाळमधील दोन शाळांचा समावेश आहे.