यवतमाळची चमू पूरग्रस्तांच्या साथीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:29 PM2019-08-10T22:29:11+5:302019-08-10T22:29:30+5:30
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील समाजकार्य महाविद्यालयाने आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती काळात विविध प्रांतात मदतकार्य केले. यावर्षीच्या पूरपरिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थ्यांची चमू तेथे प्रत्यक्ष कार्य करणार आहे. यासाठी ९० विद्यार्थ्यांची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. महाविद्यालयातील द्वितीय आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी यासाठी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जलप्रलयाच्या ठिकाणी ही चमू मदत करणार आहे. रविवारी समाजकार्य महाविद्यालयातून मदतफेरी काढली जाईल. मदत साहित्य स्वीकारण्यासाठी विठ्ठलवाडी भागातील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयासह आठ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रपरिषदेला प्रा. घनशाम दरणे, मिनल जगताप आदींची उपस्थिती होती.
आपत्ती काळात मदतीचा हात
यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाने देशात निर्माण झालेल्या आपाद्ग्रस्त परिस्थितीत मदतीचा हात दिला आहे. गेली ३५ वर्षांपासून महाविद्यालय यासाठी पुढाकार घेत आहे. २००१ मध्ये गुजरात भूकंप, २००४ मधील त्सुनामी, २००८ मधील बिहार राज्यातील पूर परिस्थिती, २०१८ मध्ये केरळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमू दाखल झाली होती. प्रत्येक ठिकाणी दोन ते चार आठवडेपर्यंत मदतकार्यात सहभाग नोंदविला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देवराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदतीसाठी रॅली
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील काही शाळा पुढे आल्या. विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून २१ हजार रुपयांची मदत गोळा केली. भाऊराव देवराव पाटील शाळा, देवीदास गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि लर्निंग पॉर्इंट इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी रॅली काढली. यावेळी रोख, धान्य, कापड आणि वस्तूरूपात मदत गोळा करण्यात आली. रॅलीसाठी संस्थेचे सचिव अनिल गायकवाड, संचालिका अश्विनी गायकवाड, मुख्याध्यापक देवराव फटींग आदींनी पुढाकार घेतला.