यजमान यवतमाळ संघाला जनरल चॅम्पियनशीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:20 PM2017-11-13T22:20:00+5:302017-11-13T22:20:12+5:30
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने सर्व खेळात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत पुरुष व महिला अशा दोन्ही गटातील जनरल चॅम्पियनशीप पटकाविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत यजमान यवतमाळ संघाने सर्व खेळात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत पुरुष व महिला अशा दोन्ही गटातील जनरल चॅम्पियनशीप पटकाविली. पुरुष गटात अकोला दुसºया तर अमरावती शहर तिसºया क्रमांकावर राहिले. महिला गटात अमरावती ग्रामीण संघ दुसरा तर बुलडाणा संघाने तिसरा क्रमांक पटकावला. अकोला संघातील सागर देशमुख व यवतमाळच्या शारदा देठे यांना बेस्ट अॅथलिट म्हणून सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ पोलीस विभागातर्फे नेहरू स्टेडियम, पोलीस मुख्यालय व पोलीस कवायत मैदान येथे अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अमरावती शहर, अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती ग्रामीण व यजमान यवतमाळ या सहा संघातील ७८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यवतमाळ संघाने पुरुष गटात अॅथलेटिक्स, कबड्डी, व्हॉलिबॉल या खेळात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत सर्वाधिक १४३ गुणांची कमाई करीत जनरल चॅम्पियनशीप पटकाविली. १३७ गुणांसह अकोला दुसºया तर ८६ गुणांसह अमरावती शहर तिसºया स्थानी राहिले. बुलडाणा ६९ गुण, अमरावती ग्रामीण ६२, वाशीम संघाला शून्य गुण मिळाले.
महिला गटातही यवतमाळ संघाने अॅथलेटिक्स, वेटलिफ्टींग, ज्युदो, खो-खो, व्हॉलिबॉल खेळात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ११३ गुण पटकावित प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. अमरावती ग्रामीण संघ ९२ गुणांसह दुसºया तर ६१ गुणांसह बुलडाणा तिसºयास्थानी राहिला. अकोला ५०, वाशीम १७ व अमरावती शहरने १० गुण प्राप्त केले.
वाशिमच्या निखिल चोपडे याने गोळाफेक क्रीडा प्रकारात तर अमरावती शहर येथील पल्लवी गणेश हिने उंच उडीमध्ये नवीन रेंज रेकॉर्ड प्रस्थापित केले.
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी यवतमाळ पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वाशीम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, बुलडाणा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, पुसदचे आयपीएस अजयकुमार बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांघिक खेळातील उत्कृष्ट खेळाडू
पुरुष गट हॉकी - विजय जटाले अकोला, फुटबॉल अब्दुल फराज अकोला, व्हॉलिबॉल रेहान खान यवतमाळ, बास्केटबॉल धीरज वानखडे अकोला, हॅन्डबॉल विक्रांत गुडवे बुलडाणा, कबड्डी यशवंत जाधव यवतमाळ, खो-खो अंकुश सयाम अकोला. महिला - व्हॉलिबॉल प्रीती पवार यवतमाळ, बास्केटबॉल भाग्यश्री काशीद अकोला, कबड्डी अतू उकंडे अमरावती ग्रामीण, खो-खो स्मिता काळे यवतमाळ.