प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक, चालक फरार; संतप्त जमावाने वाहन पेटवले
By सुरेंद्र राऊत | Published: September 23, 2022 08:02 PM2022-09-23T20:02:31+5:302022-09-23T20:08:37+5:30
यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर अपघात झाला, यावेळी स्थानिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला
यवतमाळ: शहरातील पांढरकवडा मार्गावर दुचाकीवरुन जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला टेम्पोची जोरदार धडक झाल्याची घटना आज(शुक्रवार) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत जोहरा शेख(रा. जफरनगर, यवतमाळ) ही तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर संतप्त जमावाने प्रवासी टेम्पो आगीच्या हवाली केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जोहरा शेख दुचाकीवरुन जात होती, यावेळी एका प्रवासी टेम्पोने सायंकाळी सहा वाजता तिला धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टेम्पो पेटवून दिला. परिसरात रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यातूनच शुक्रवारचा अपघात घडला.
प्रवासी टेम्पोची विध्यार्थीनीला धडक; जमावाने वाहन पेटवले pic.twitter.com/B4HqlPCpPc
— Lokmat (@lokmat) September 23, 2022
वाहतूक पोलीस रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकवर कारवाई करत नसल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी काही काळ रास्ता रोको करत नागरिकांनी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली. रस्त्यावरच्या ट्रकची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी अशी मागणी नागरिकांनी केली. शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.