यवतमाळ शहरात वाहतूक बेलगाम

By admin | Published: June 4, 2016 02:03 AM2016-06-04T02:03:10+5:302016-06-04T02:03:10+5:30

शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक बेलगाम झाली आहे.

Yavatmal traffic in Belgaum city | यवतमाळ शहरात वाहतूक बेलगाम

यवतमाळ शहरात वाहतूक बेलगाम

Next

पोलीस बायपासवर व्यस्त : टोर्इंग वाहन, पार्किंग पट्टे बेपत्ता
शहरात ठिकठिकाणी निर्माण झाले अपघात झोन
यवतमाळ : शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक बेलगाम झाली आहे. विस्कळीत वाहतुकीतून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत असून शहरात अनेक अपघात झोन तयार झाले आहे. लहान सहान अपघात नित्याचीच बाब झाली असून वाहतुकीला शिस्त लावणारे पोलीस बायपासवर ‘व्यस्त’ असतात.
जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहराच्या वाहतुकीला अलिकडे शिस्तच नसल्याचे दिसून येते. शहराच्या कोणत्याही भागात याचे सहज दर्शन घडते. अत्यंत वर्दळीच्या बसस्थानक परिसरात याचा प्रत्यय पदोपदी येतो. बसस्थानकाच्या गेट क्र. २ पासून ते सिग्नलपर्यंत वाहतुकीची नेहमीचीच कोंडी होते. सकाळी १० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळात या रस्त्यावर वाहतुकीचे धिंडवडे निघताना दिसून येते. विशेष म्हणजे याच चौकात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. सिग्नल तोडून जाणारे वाहनधारकही या वाहतुकीच्या गोंधळात भर घालतात. दत्त चौक ते नेताजी चौक या मार्गावर सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. हातगाडीवाले थेट रस्त्याच्या मधोमध माल विक्रीसाठी उभे असतात. त्यामुळे महिलांना या भागातून जाताना त्रास सहन करावा लागतो. सायंकाळी तर येथून पायदळ जाणे म्हणजे मोठे दिव्य असते.
नेताजी चौकात दिवसभरच वाहनधारक गोंधळलेल्या स्थितीत असतात. दत्त चौकाकडून येणाऱ्या वाहनधारकाला नेमके कोणत्या दिशेला जायचे आहे याचा समोरील वाहन चालकाला अंदाज येत नाही. राज्य मार्गावरील भरधाव वाहतूक, महादेव मंदिर रोडकडून येणारे वाहन चालक यामुळे या चौकात नेहमी गोंधळाची स्थिती असते. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी वाहतूक शिपायाच्या खऱ्या अर्थाने गरज आहे. तहसील चौक परिसरात रस्ता दुभाजक निर्माण करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी वाहनधारकांसाठी नेहमी अडचणीची ठरते. मुख्य बाजारपेठ, इंदिरा गांधी मार्केट या परिसरातही नेहमीच गर्दी असते. स्टेट बँक चौकात सिग्नल असला तरी कोण कोणत्या दिशेला जाणार हे कळून येत नाही. आर्णी नाका परिसरातही वाहतुकीची कोंडी असते. या ठिकाणी अरुंद झालेल्या रस्त्यावर एसटी बस प्रवासी घेण्यासाठी थांबल्यानंतर मागून येणाऱ्या वाहनधारकांंना समोर जाताना मोठी कसरत करावी लागते. यातूनच येथे अनेकदा अपघात झाले आहे. दारव्हा मार्गावर सुसाट वाहनांची स्पर्धा असते. अवैध प्रवासी वाहन भरण्याचे ठिकाण म्हणजे तर गोंधळाचे केंद्रच झाले आहे. चिंतामणी पॉर्इंट, जिल्हा परिषदेसमोर, बसस्थानक चौकालगतच्या गार्डन रोडवर अवैध प्रवासी वाहनांचे अड्डे झाले आहे.
यवतमाळ शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. मात्र या वाहतूक शाखेचे शिपाई बायपासवर ‘व्यस्त’ दिसतात. केवळ अधिकाऱ्यांसमोर देखावा निर्माण करण्यासाठी एलआयसी चौक आणि बसस्थानक चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. मात्र तेथेही ग्रामीण भागातील सावज टिपण्याचीच धडपड दिसून येते. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कुठेही वाहतूक पोलीस दिसत नाही. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. परंतु त्यासाठी कोणत्याच उपाययोजना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

शहरात ठिकठिकाणी निर्माण झाले अपघात झोन
यवतमाळ शहरात ठिकठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे अपघात झोन तयार झाले आहे. गांधी चौक ते हनुमान आखाडा रस्त्यावर सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केले जातात. दूध विकत घेण्यासाठी आलेले ग्राहक मनमानेल तसे वाहन उभे करून दुकानात शिरतात. पार्किंगची येथे कोणतीच व्यवस्था नसल्याने नाईलाजाने ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्याचा त्रास या मार्गावरून जाणाऱ्यांना सहन करावा लागतो. कधी कधी वाहतूक पोलिसांची येथे व्हीजीट असते परंतु एक-दोन दिवसात पुन्हा दृश्य पूर्वीसारखेच होऊन जाते. हनुमान आखाडा चौक ते इंदिरा गांधी मार्केट रोड परिसरात वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभे केलेले असते.

Web Title: Yavatmal traffic in Belgaum city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.