समाजकार्य महाविद्यालयाच्या ७५ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचे १२ दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:19 PM2018-09-04T16:19:35+5:302018-09-04T16:20:11+5:30

शैक्षणिक आयुष्यातच जीवनाचेही धडे मिळावे, म्हणून यवतमाळातील दोन शिक्षकांनी आपले विद्यार्थी थेट केरळच्या पूरग्रस्त भागात नेले आहेत. सहलीला नव्हे, मदतीला. पूरपीडितांचे जगणे सुकर करता-करता जगणे शिकायला!

Yavatmal: Two teachers, including 75 students of social work college, have been helped in Kerala for 12 days. | समाजकार्य महाविद्यालयाच्या ७५ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचे १२ दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्य

समाजकार्य महाविद्यालयाच्या ७५ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचे १२ दिवसांपासून केरळमध्ये मदतकार्य

Next
ठळक मुद्दे‘चौकटीबाहेर’चे अध्यापन

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चार भिंतींच्या वर्गात सिलॅबस पूर्ण करायचा आणि लेखी परीक्षेचा १०० टक्के निकाल लावायचा, हे झाले पारंपरिक शिक्षण. पण प्रत्यक्ष जगातले ज्ञान पुस्तकापेक्षाही अफाट आहे. ते विद्यार्थ्यांना मिळणार कधी? शैक्षणिक आयुष्यातच जीवनाचेही धडे मिळावे, म्हणून यवतमाळातील दोन शिक्षकांनी आपले विद्यार्थी थेट केरळच्या पूरग्रस्त भागात नेले आहेत. सहलीला नव्हे, मदतीला. पूरपीडितांचे जगणे सुकर करता-करता जगणे शिकायला!
महाराष्ट्रात बुधवारी शिक्षक दिन साजरा होत आहे. शासन आणि शिक्षकही पुरस्कार देण्या-घेण्याच्या तयारीत आहे. पण यवतमाळचे प्रा. घनश्याम दरणे आणि प्रा. राजू केंद्रे हे दोन शिक्षक केरळमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनशिक्षणाचे धडे देण्यात व्यग्र आहेत. विद्यार्थ्यांना अनुभव मिळतोय अन् केरळच्या पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या माणुसकीचे दर्शन घडतेय.
२४ आॅगस्टच्या रात्री हे दोन शिक्षक ७५ विद्यार्थ्यांसह यवतमाळहून सेवाग्रामला आणि तेथून थेट केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात पोहोचले. अन् सुरू झाली प्रत्यक्ष जीवनशाळा. पूरग्रस्त लोकांचे चेहरे हाच फळा अन् शिकविणारा शिक्षक बनला रौद्र निसर्ग. पण ही नुसती शाळा नव्हती, पावलोपावली थेट परीक्षाच होती. अन् निकाल होता अनुभव. येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे हे ‘चौकटीबाहेर’चे अध्यापन सध्या यवततमाळात चर्चेचा विषय ठरला आहे.

- कसे शिकत आहेत विद्यार्थी?
यवतमाळातून केरळमध्ये पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २० मुली आहेत. ५५ मुले आहेत. एर्नाकुलम या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहाचल्यावर विद्यार्थ्यांच्या तीन चमू तयार करण्यात आल्या. त्यांचा एक टीम लिडर नेमण्यात आला. देशभरातील विविध संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी येणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचे एका ठिकाणी वर्गीकरण करण्याचे काम पहिल्या चमूला देण्यात आले. हे काम म्हणजे, ट्रकमधून माल उतरविणे, ते निट रचून घेणे, नंतर त्यातून हजारो ‘फॅमिली किट’ तयार करणे. या किट (जीवनावश्यक वस्तू) प्रत्यक्ष पूरग्रस्तांना पोहोचविण्याची जबाबदारी दुसऱ्या चमूला देण्यात आली. पण तत्पूर्वी तिसऱ्या चमूने प्रत्यक्ष लोकांना भेटून कोण गरजू आहे, याचे सर्वेक्षण करून आणायचे. हे काम गेल्या १२ दिवसांपासून शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी करीत आहेत. एर्नाकुलम, पट्टनमथीटा, आलेप्पी, इडुपी, वायनाड, त्रिसूर आदी पुराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये हे शिक्षक-विद्यार्थी शिकत आणि शिकवत आहेत. पुराने पडलेली घरे उभारण्यात मदत करणे, घरातील गाळ काढणे, पुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांना मानसिक दिलासा देणे आदी कामे विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली आहेत.

अशा संकटसमयीच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळते. म्हणून आम्ही पोरांना घेऊन येथे पोहोचलो. येथे दु:खाचे, मृत्यूचे प्रत्यक्ष दर्शन बरेच काही शिकवून गेले. रात्री एक दीड वाजेपर्यंत पोरं काम करतात. पहाटे पाच वाजता उठून कामाला लागतात. हा जीवनशिक्षणाचाच भाग आहे. भाषेची अडचण असूनही मुलं केरळवासीयांशी अत्यंत सहृदयपणे संवाद साधून त्यांना दिलासा देत आहेत. यापूर्वीही आम्ही गुजरातचा भूकंप, बिहारचा भूकंप, तमिळनाडूतील त्सुनामी अशा प्रसंगात विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो.
- प्रा. घनश्याम दरणे, यवतमाळ (सध्या एर्नाकुलम, केरळ)

 

Web Title: Yavatmal: Two teachers, including 75 students of social work college, have been helped in Kerala for 12 days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.