यवतमाळ अर्बन ‘सहकार’कडे

By admin | Published: January 14, 2016 03:13 AM2016-01-14T03:13:41+5:302016-01-14T03:13:41+5:30

१६ पैकी १२ जागा जिंकल्या : तीन जागांचे निकाल रोखले, एक जागा समन्वयकडे

Yavatmal Urban 'Co-operative' | यवतमाळ अर्बन ‘सहकार’कडे

यवतमाळ अर्बन ‘सहकार’कडे

Next

यवतमाळ : यवतमाळ अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या सर्व बाराही जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार पॅनलने जिंकल्या आहेत. तीन जागांचे निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे १९ जानेवारीपर्यंत राखून ठेवण्यात आले आहे. तर समन्वयचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला.
मनोहर देव-अजय मुंदडा-आशीष उत्तरवार यांच्या नेतृत्त्वात ‘सहकार’ पॅनलने १५ जागा लढविल्या, तर भाऊसाहेब मारोडकर-सुशील कोठारी यांच्या नेतृत्वात समन्वय पॅनलने १३ जागा लढविल्या. दोन जागांवरील त्यांचे उमेदवार उच्च न्यायालयाने बाद ठरविले होते. आतापर्यंतच्या १७ ते २० टक्के मतदान झालेल्या या बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ४० टक्केपर्यंत मतदानाचा पल्ला गाठला गेला. समन्वय पॅनलने सर्व ताकदीनिशी केलेली तयारीच हा आलेख वाढविण्यास कारणीभूत ठरली. या पॅनलला विजय मिळविता आला नसला तरी, सहकारच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या जवळपास जाता आले.
मतमोजणीला येथील गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दुपारपर्यंत मतपत्रिका जुळविण्याचेच काम चालले. दुपारी ४ वाजता पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचवेळी जवळपास चित्र स्पष्ट झाले होते. सहकारच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती. बुधवारी पहाटे सर्व निकाल जाहीर करण्यात आले. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांकडून विजयी जल्लोष केला जात होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यवतमाळच्या सहायक निबंधक तथा प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी काम पाहिले. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
उमेदवारांना मिळालेली मते
सहकार पॅनल - प्रशांत माधमशेट्टीवार (१६४६५), संजय पालतेवार (१७१६८), संजय डेहनकर (१७३१४), गोवर्धन राठोड (१६७५०), प्रमोद धुर्वे (१७१४४), मीरा घाटे (१६७०४), वैदेही नायगावकर (१५२८६), मोहन देव (१३८८९), नितीन खर्चे (१५६७३), अजय मुंधडा (१६०५०), चंद्रकांत रानडे (१५७५०), आशीष उत्तरवार (१५३९४).
समन्वय पॅनल - भाऊसाहेब मारोडकर (१२५५७), गजानन बेजंकीवार (११७५३), प्रकाश गोकुळे (११५३७), श्रीनिवास अडपावार (१२७५८), अरविंद पट्टे (११७८३), पुष्पा गांधी (१२३८३), रमेश बोचरे (१११०६), अभयसिंह घुईखेडकर (१०७४९), सुशील कोठारी (१११३९), पांडुरंग खांदवे (११२०४). श्रीधर देशपांडे यांनी १५४७ मते घेतली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Yavatmal Urban 'Co-operative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.