यवतमाळ : आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:44 AM2017-11-14T02:44:17+5:302017-11-14T02:44:31+5:30
आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकणा-या निरागस विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.
ढाणकी (यवतमाळ) : आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकणा-या निरागस विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. टेंभेश्वर मंदिर परिसरातील तळ्याजवळ त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. खुनाचे कारण आणि मारेकºयांचा अद्यापही उलगडा झाला नाही.
प्रदीप शेळके (७, रा. पार्डी-चुरमुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही अनुदानित आदिवासी आश्रमशाळा भाजपाचे उमरखेड येथील माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची आहे.
प्रदीप ढाणकी येथील प्राथमिक अनुदानित आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी ४ वाजता त्याने वसतिगृहातील विद्यार्थिनींना दुकानातून खाऊ आणून दिला. त्यानंतर सायंकाळी जेवणाच्या वेळी हजेरी घेताना प्रदीप वसतिगृहात आढळला नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका, अधीक्षिका व कर्मचाºयांनी त्याचा शोध घेतला. कर्मचाºयांनी शाळेलगतचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही. रात्री २ वाजताच्या सुमारास बिटरगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
सोमवारी सकाळी पुन्हा शाळेतील कर्मचाºयांनी प्रदीपचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेपासून ५०० मीटर अंतरावर मृतदेह आढळला.