यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

By विशाल सोनटक्के | Published: April 27, 2023 02:05 PM2023-04-27T14:05:46+5:302023-04-27T14:15:02+5:30

१५२ घरांची पडझड : पिकांचे मोठे नुकसान, ४२ जनावरेही दगावली

Yavatmal was hit by bad weather; Heavy rains in five mandals | यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

यवतमाळला अवकाळीने झोडपले; पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी

googlenewsNext

यवतमाळ : सलग तिसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. जिल्ह्यात सरासरी २४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून पाच मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या वादळी पावसात जिल्ह्यातील १५५ घरांची अंशत: पडझड झाली असून ४२ जनावरांचाही अवकाळीने बळी घेतला आहे. पावसामुळे भाजीपाला, कांदा, ज्वारीसह पपई आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील तीन दिवसांंपासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले होते. या पावसात ७८ घरांची पडझड होवून दोन जनावरेही दगावली होती. बाभूळगाव, आर्णी, दिग्रस, दारव्हा आणि घाटंजी या तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत सरासरी २० मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी सायंकाळी पुन्हा यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.

बाभूळगाव, आर्णीसह अन्य तालुक्यात पावसाचा जोर होता. बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून येथे ७०.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आर्णी तालुक्यातील जवळा मंडळात ९२ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर तालुक्यातील चालबर्डी मंडळात ६८ मिमी तर केळापूर मंडळात ६९.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटंजी तालुक्यातील घोटी मंडळातही अतिवृष्टी झाली असून येथे ७१.२५ मिमी पाऊस कोसळला आहे.
गारपीट आणि वादळी पाऊस मुक्या जनावरांच्या जीवावर उठला आहे. बुधवारी झालेल्या पावसात लहान २३ आणि मोठे १९ अशा एकूण ४२ जनावरांचा मृत्यू झाला. तर १५५ घरांची अंशत: पडझड झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Yavatmal was hit by bad weather; Heavy rains in five mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.