यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातच लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:00 PM2018-02-15T22:00:15+5:302018-02-15T22:03:38+5:30
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच.....
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचे खुद्द गवळी यांनीच स्पष्ट केले आहे.
बुधवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामभवनावर भावनातार्इंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. भावनाताई यावेळी यवतमाळ-वाशिममधून लढणार नाहीत, हिंगोलीत जाणार, रिसोड विधानसभा लढणार, भाजपात जाणार या सर्व अफवाच असल्याचे भावना गवळी यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, २००९ पासून आपल्या लोकसभेतील उमेदवारीबाबत मनगढंत चर्चा रंगविल्या जातात. मात्र आपण यवतमाळ-वाशिम मतदारसंघात कायम आहोत. माझ्या लोकसभा क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी दिग्रस-नेरमध्ये शिवसेना मजबूत आहे. उर्वरित तीन विधानसभेतही शिवसेनेने चांगली पकड घेतली आहे. यात यवतमाळ व कारंजा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेतील कोणताही गट स्वत:चे हित जोपासण्यासाठी नसून पक्ष कसा बळकट होईल, याचा विचार करतो. एखाद्या पदाबाबत मंत्र्यांसोबत टाय झाला. मात्र त्यांचा दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणच्या ध्येय धोरणाची दिशा ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. बरेचदा लगतच्या हिंगोली मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून तेथून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला जातो. मात्र ते त्यांचे प्रेम आहे. तथापि काम करताना मतदार संघाची मर्यादा आपण बाळगत नाही. त्यामुळे हिंगोली व अकोला क्षेत्रातील अनेक जण आपणाशी जुळले आहे. यातूनच ही चर्चा घडवून आणली जाते, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, संजय रंगे, किशोर इंगळे, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गजानन डोमाळे आदी उपस्थित होते.
तिसऱ्या जिल्हा प्रमुखाची होणार एन्ट्री
१६ तालुके व जिल्ह्याचा एकूण भौगोलिक व्याप लक्षात घेता शिवसेनेत आता दोन नव्हे तर तीन जिल्हा प्रमुख राहणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ही नवी संकल्पना राबविली जाणार आहे. तिसऱ्या जिल्हा प्रमुखासाठी नावांचा प्रस्ताव ‘मातोश्री’कडे पाठविण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे खासदार भावना गवळी यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे चार आमदार निवडून येऊ शकतात
जिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड आणि वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना निर्णायक आहे. येथे आणखी थोडा जोर लावल्यास जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार सहज निवडून येऊ शकतात. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पक्ष बांधणीबाबत भूमिका मांडली आहे. लवकर त्यावर सकारात्मक आदेश येणार असल्याचा विश्वास खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केला.