गणेशोत्सवात आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळचा डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:55 AM2020-09-04T11:55:14+5:302020-09-04T12:18:41+5:30
ऑनलाईन घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळच्या एका गणपती मूर्तीने बक्षिस पटकावून सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जगात गणेश भक्तांची मोठी संख्या आहे. यामुळे संपूर्ण जगभर गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे त्यावर विरजण पडले. मात्र ऑनलाईन घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सजावट आणि विधायक संदेश स्पर्धेत यवतमाळच्या एका गणपती मूर्तीने बक्षिस पटकावून सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला.
गणेश चतुर्थी देशातच नव्हे, तर जगभरात साजरी केली जाते. या अनुषंगाने जॉर्जीया देशात युपी टिव्हीने घरगुती गणेश उत्सवाची उत्कृष्ट सजावट आणि विधायक संदेश ही ऑनलाईन स्पर्धा घेतली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, सौदी अरेबिया, न्यूझिलन्ड बिच, यूएसए, कॅनडा आदी देशांमधील सुमारे दीड लाख गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला. यातून २० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात उत्तम सजावट, उत्कृष्ट मांडणी, संकल्पना आणि रेखीव गणेश मूर्तींचा समावेश होता. या स्पर्धेत यवतमाळातील घरगुती गणेश उत्सवाची नोंद घेण्यात आली. यात सुबक मूर्ती आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील देखाव्यासाठी यवतमाळच्या र्स्पधकाला बक्षिस घोषित झाले आहे.
यवतमाळातील मारवाडी चौक स्थित सुमित हेमंत महेंद्रे असे विजेत्याचे नाव आहे. त्यांचे कुटुंबीय गत ५४ वर्षांपासून घरगुती गणेश उत्सव साजरा करते. प्रत्येकवर्षी आकर्षक देखावा केला जातो. त्यामुळे त्यांच्या घरचा गणेश उत्सव शहरात चर्चेचा ठरतो. यावर्षी सुमितच्या गणेशोत्सवाने थेट सातासम्रुदापार झेप घेतली.
जार्जीयाच्या यूपी टिव्हीने घेतलेल्या ऑनलाईन घरगुती गणेश उत्सव स्पर्धेत आकर्षक मूर्ती, डेकोरेशन आणि विशेष थिम, यावर २० उत्कृष्ट गणेश भक्तांची निवड करण्यात आली. त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, सौदी अरेबिया, न्यूझिलन्ड बिच, यूएसए, कॅनडा येथिल स्पर्धक विजेते ठरले. त्यात भारतातील पाच गणेश भक्तांचा समावेश आहे. या पाचमध्ये यवतमाळातील सुमित हेमंत महेंद्रे यांच्या मूर्तीचा समावेश आहे. त्यांची मूर्ती आकर्षक आणि लक्ष वेधणारी ठरली. तसेच उत्तम डेकोरेशन, वैविध्यपूर्ण कल्पनाही होती. ब्राम्हण वेषातील बाल गणेशासोबत लक्ष्मी, सरस्वती आणि मूषक होते.
याशिवाय सुमितने कोरोना जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविला. यात भाविकांना सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळल्यानंतरच दर्शन दिले. यामुळे कोरोनाला अटकाव करता येत होता. यामुळे सुमितच्या गणेश उत्सवाची नोंद घेतली गेली. त्याला सन्मानपत्र दिले जाणार आहे.
मुंबईच्या स्पर्धेत सन्मानचिन्ह मिळणार
मुंबई येथील गणपती टिव्हीनेही राज्यभरात गणेश सजावटीची स्पर्धा घेतली. या स्पर्धेतही सुमितला यावर्षीचा उत्कृष्ट गणेश मूर्ती आणि सजावटीसाठी पुरस्कार घोषित झाला आहे. या सजावटीत त्याने वेरूळ येथील अजंठा लेणीच्या मूर्तीचे नक्षीकाम केले होते.
दुर्मीळ नाणे, टाकावू वस्तूंचा वापर
सुमितने यापूर्वी दुर्मीळ नाणे, डिस्पोजल वस्तू आणि चलनातील नाण्यांपासून डेकोरेशन तयार केले होते. त्यावेळी गणेश दर्शनासाठी प्रचंड वर्दळ होती. यावर्षी आकर्षक मूर्ती आणि विविध समाजप्रबोधनपर संदेशाने ही गर्दी नियंत्रणात होती. ऑनलाईन दर्शनावर त्यांनी भर दिला होता.