यवतमाळ वर्ल्डकप फुटबॉल फिव्हर स्पर्धा
By admin | Published: May 31, 2014 12:14 AM2014-05-31T00:14:38+5:302014-05-31T00:14:38+5:30
जून महिन्यात ब्राझील देशात होणार्या विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हय़ात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेहरू स्टेडियम येथे १ ते ५ जून
यवतमाळ : जून महिन्यात ब्राझील देशात होणार्या विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हय़ात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेहरू स्टेडियम येथे १ ते ५ जून या कालावधीत वर्ल्डकप फुटबॉल फिव्हर स्पर्धा व फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि न्यू लाईफ फुटबॉल क्लबद्वारा या नाविण्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ वर्षाआतील मुलांकरिता या स्पर्धा असून यात अमरावती, अकोला, पुसद, दारव्हा, वणी व यजमान यवतमाळचे संघ सहभागी होणार आहे.
संपूर्ण जगात विशेषत: युरोप, अफ्रिका व अमेरिका खंडात फुटबॉल खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या खेळाची देशात लोकप्रियता वाढावी, दज्रेदार खेळाडू तयार व्हावेत, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या हेतूने प्रथमच शासकीय स्तरावर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या पुढाकाराने या स्पर्धा व फुटबॉल कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी पत्रपरिषदेत दिली.
१ ते ५ जूनपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. १ जून रोजी सायंकाळी ४.३0 वाजता नेहरु स्टेडियम येथून फुटबॉल खेळाडूंची रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. २ जूनपासून दररोज सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत फुटबॉलचे साखळी सामने होतील. या व्यतिरिक्त फुटबॉल कार्यशाळेत २ जूनला सकाळी १0 वाजता फुटबॉल खेळाचे तांत्रिक कौशल्य याविषयावर राज्य क्रीडा मार्गदर्शक धीरज मिश्रा मार्गदर्शन करणार आहे. रात्री ८ वाजता खेळाडूंसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन होईल. ३ जूनला सकाळी १0 वाजता डॉ. जावेद सौदागर यांचे ‘प्रथमोपचार व खेळातील इजा’ याविषयावर मार्गदर्शन होईल. रात्री ९ वाजता ‘कॅम्प फायर ट्रेझर हंट’ हा नाविण्यपूर्ण कार्यक्रम, ४ जूनला सकाळी ८.३0 वाजता प्राची दत्ता यांचे आहाराविषयी मार्गदर्शन तर डॉ.बाळासाहेब साखरे यांचे योगा मार्गदर्शन.
५ जून रोजी ६ ते सायंकाळच्या सत्रात फुटबॉल उपांत्य सामना ज्येष्ठ फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक हरिहर मिश्रा यांचे व्याख्यान, सायंकाळी ५ वाजता फुटबॉल फिव्हर स्पर्धेचा अंतिम सामना, बक्षीस वितरण व समारोप असे पाच दिवस भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत.पत्रपरिषदेला धीरज मिश्रा, न्यु लाईफ फुटबॉल क्लबचे राजेश कळसकर आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)