यवतमाळकरांची तहान भागविणारेच तहानलेले

By admin | Published: May 23, 2016 02:24 AM2016-05-23T02:24:31+5:302016-05-23T02:24:31+5:30

संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे

Yavatmalakar thirsty thirsty | यवतमाळकरांची तहान भागविणारेच तहानलेले

यवतमाळकरांची तहान भागविणारेच तहानलेले

Next

धरण उशाला-कोरड घशाला : जॅकवेल कर्मचारी, बरबडा व चौधरा गावकऱ्यांची व्यथा
रूपेश उत्तरवार यवतमाळ
संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे जॅकवेल कर्मचारीच निळोणा धरणाच्या पाण्यापासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चापडोह प्रकल्प किंवा लगतच्या शेतशिवारातील विहिरींवर अवलंबून रहावे लागते.
निळोणा धरण पूर्णत: आटल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असा हा प्रकार पुढे आला. १९७२ ला यवतमाळच्या दक्षिणेकडे गोधनी गावाजवळ निळोणा धरण अस्तित्वात आले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या सुरक्षेसह पाणीपुरवठा नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तेथेच निवासाची व्यवस्था केली गेली. आजच्या घडीला तेथे सुमारे १५ कर्मचारी कुटुंबासह राहतात. शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांनाच या निळोणा धरणाचे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. सुरुवातीची काही वर्ष हे कर्मचारी जुन्या विहिरीचे पाणी पित होते. परंतु त्यात ब्लिचींग पावडर नसल्याने आजाराचा धोका वाढला. त्यामुळे प्रकल्प क्षेत्राच्या गावातील जुन्या विहिरींचे पाणी बंद झाले. नंतरच्या काळात चापडोह प्रकल्पावर शुद्धीकरण केंद्र तयार झाल्याने हे कर्मचारी तेथून पाणी आणतात. अनेकदा त्यांना शेतशिवारातील विहिरींचा आधार घ्यावा लागतो. कित्येकदा यवतमाळवरून पाणी नेण्याची वेळ त्यांच्यावर येते. लाखो नागरिकांना पाणी पाजणारेच तहानलेले आहेत. त्यांच्या पाणीटंचाईकडे कुणाचेच लक्ष नसते.

पाणी डोळ्याने दिसते पण पिता येत नाही
निळोणा धरणाचे अथांग पाणी घराच्या अंगणातून वर्षभर डोळ्याने दिसते. परंतु पिता येत नाही, अशी व्यथा या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बरबडा व चौधरा या गावातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविली. बरबडा गावात पाच हातपंप आहे, यातील चार दूषित असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक हातपंप आहे पण आता उन्हाळ्यात तोसुद्धा खोल गेला आहे. गावातील सार्वजनिक विहिरीला पाण्याचा थेंब नाही. शेतातील विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. चौधरा गावासाठी जलस्वराज्यमधून नळ योजना सुरू झाली. मात्र वीज पुरवठा नसल्याने व पाणी खोल गेल्याने ते मिळत नाही. आज या गावात प्रत्येकाच्या डोळ्यापुढे धरणातील पाणी आहे. मात्र ते पिता येत नाही, अशी अवस्था आहे. चौधरा गावाला जाण्यासाठी कच्चा रोड आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन ते तीन दिवस तो सुरु होत नाही. गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. केव्हाही गावातील आबालवृद्ध पाणी भरण्यातच व्यस्त दिसतात. चौधरा येथील सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली सुरेश मेश्राम यांनी गावकऱ्यांची ही व्यथा ‘लोकमत’कडे मांडली.

शुद्ध पाणी मिळत नाही - उत्तम मोकाशे
निळोणा धरणाच्या जॅकवेलवर १९७४ पासून पंप आॅपरेटर पदावर कार्यरत असलेले उत्तम मोकाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, निळोणा धरणाचे पाणी हे रॉमटेरियल आहे. त्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध झाल्यानंतरच ते शहराला पुरवठा केले जाते. परंतु निळोणातील हे शुद्ध पाणी आम्हाला कधीच मिळत नाही. चापडोहच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आम्हाला पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते.

Web Title: Yavatmalakar thirsty thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.