यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा
By admin | Published: May 22, 2017 01:51 AM2017-05-22T01:51:42+5:302017-05-22T01:51:42+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड
मृतसाठा संपला : आठ दिवसांआड पाण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आता तीन दिवसांआड पाणी पुरवठा करणे प्राधिकरणाला शक्य होणार नाही. त्यामुळे लवकरच आठ दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा असा सल्ला जीवन प्राधिकरणाने दिला आहे.
यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता कमी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रकल्पातील साठा कमी पडतो. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वेळेपूर्वीच संपून जाते. यंदाही निळोणातील पाणी १५ दिवसापूर्वी संपले. त्यानंतर प्राधिकरणाने प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू केला. आता मृतसाठाही केवळ दोन-तीन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण भिस्त चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर राहणार आहे. चापडोहमध्ये मुबलक पाणी असले तरी पुरेशा प्रमाणात पाणी ओढणारी यंत्रणा प्राधिकरणाकडे नाही. साठवण क्षमता लक्षात घेता प्राधिकरणाला दररोज लागणाऱ्या पाण्यापेक्षा निम्मेच पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. सध्या यवतमाळकरांना तीन दिवसाआड अर्थात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरविले जाते. चापडोहमधून पाणी घेतल्यास यवतमाळकरांना आठ दिवसातून एकदाच पाणी मिळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक भागाला पाणी पोहोचवितानाही मोठी कसरत करावी लागेल.
पावसाळ्यात निळोणा धरण ओव्हर-फ्लो होईपर्यंत यवतमाळकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
१६ दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता
४निळोणा आणि चापडोह प्रकल्पातून शहराला ३३ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. निळोणातून १६ दशलक्ष लिटर तर चापडोहतून १७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. आता निळोणातील १६ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा थांबेल. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.