श्रीदेवीच्या हस्ते यवतमाळकन्येचा झाला होता गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:11 PM2018-02-26T21:11:59+5:302018-02-26T21:11:59+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने देशभरातील रसिकांच्या मनाला चटका लागलेला आहे. श्रीदेवीच्या हस्ते गौरव झालेल्या यवतमाळच्या कन्येला मात्र ही वार्ता कळताच अश्रू अनावर झाले.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाने देशभरातील रसिकांच्या मनाला चटका लागलेला आहे. श्रीदेवीच्या हस्ते गौरव झालेल्या यवतमाळच्या कन्येला मात्र ही वार्ता कळताच अश्रू अनावर झाले.
ललिता अभय टोंगो असे या कलावंत कन्येचे नाव आहे. २००३ सालची गोष्ट आहे. ललिता येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात बीए करीत होत्या. त्यावेळी अमरावती येथे झालेल्या ‘युथ फेस्टिवल’मध्ये त्यांनी कला सादर केली. पहिला क्रमांकही पटकावला. त्यावेळी श्रीदेवी बक्षीस वितरणासाठी अमरावतीत आल्या होत्या. ललिता यांना पारितोषिक देताना श्रीदेवी म्हणाल्या होत्या, लहानशा कुटुंबातून एखादी मुलगी कला सादर करण्यासाठी इथपर्यंत पोहोचते हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कलाकार आणि कलेविषयी प्रचंड आदर श्रीदेवीने व्यक्त केला होता. तेव्हा खास श्रीदेवीला पाहण्यासाठी म्हणून प्राची इनामदार, प्रिती पेशवे या मैत्रीणी व डॉ. कुडमेथे ललिता टोंगो यांच्यासोबत उपस्थित होते. ललिता सध्या ‘युएसए’मध्ये असून श्रीदेवीच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांनी वडिलांंना फोन करून आठवणी जागविल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.