यवतमाळकरांची जिद्द आवडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:48 PM2019-01-13T23:48:03+5:302019-01-13T23:49:07+5:30
माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : माझ्यासारख्या असंख्य साहित्यिकांनी या संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच यवतमाळ पाहिले. पण हे गाव आम्हा साहित्यिकांना खूप आवडले. या संमेलनावर संकट ओढवले होते. पण यवतमाळकरांच्या जिद्दीच्या बळावर संमेलन यशस्वी झाले. या गावातील लोकांची जिद्द आवडली. आतिथ्यशील स्वाभावाचे गाव ही यवतमाळची ओळख घेऊन आम्ही येथून जाऊ, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी यवतमाळनगरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देशभरातील साहित्यिक गेले तीन दिवस यवतमाळात डेरेदाखल होते. रविवारी या मान्यवर साहित्यिकांनी यवतमाळवासीयांबाबत कृतज्ञता व्यक्त करत-करत या शब्दसोहळ्याची भावनिक सांगता केली. ४५ वर्षांपूर्वी येथे साहित्य संमेलन झाले होते. आता २०१९ मध्ये त्याला भव्य रुप आले. ही भावना करताना अनेकांनी प्रा. राहुल एकबोटे यांनी सादर केलेल्या ‘इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ या रचनेचा उल्लेख केला. खुद्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यवतमाळसारख्या गावात रसिकांची एवढी प्रचंड गर्दी जमू शकते हे पाहून अक्षरश: भारावून गेल्या. त्या म्हणाल्या, हे संमेलन कसे होईल याचे दडपण होतेच. पण येथील रसिकांनी पहिल्या दिवशीपासूनच जो उदंड दिला, ते पाहून मळभ दूर झाले.
- पोलिसांचे साहित्यप्रेम
संमेलनस्थळी तैनात असलेल्या पोलिसांचे साहित्यप्रेम पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे संमेलनाध्यक्ष ढेरे यांनी सांगितले. पुस्तकं विकत घेणारे पोलीस पाहायला मिळाले. स्टॉलवर जाऊन आम्हाला अमूक पुस्तक हवे, अशी यादी देणारे पोलीस पाहायला मिळाल्याचे ढेरे म्हणाल्या. तर या गावातील महिलांनी संमेलनस्थळावरील स्वच्छतेची जबाबदारी अत्यंत कुशलतेने हाताळल्याचे मत साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर यांनी नोेंदविले. तीन दिवस गोळा झालेल्या कचऱ्यातून खत निर्मिती होणार असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.
यवतमाळबाबत सलग तीन तास गौरवोद्गार व्यक्त करत असतानाच कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. लोणी येथील द. तु. नंदापुरे गुरुजी आणि सेंद्रीय शेती करणारे सुभाष शर्मा यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गौरविण्यात आले. तर माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे आत्मचरित्र मान्यवर साहित्यिक सोबत घेऊन गेले.
या गावाला जादा निधी द्या
साहित्य संमेलनासाठी तीन दिवस मुक्कामी राहिलेल्या मान्यवर साहित्यिकांनी या जिल्ह्यातील माणसे कशी आहेत, याचे अवलोकन करण्याचा प्रयत्न केला. या जाणीवेतूनच समारोपीय कार्यक्रमात संमेलनाने एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला. यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी, भटके विमुक्त यांची लोकसंख्या ५५ टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्याला सरकारने विशेष जिल्ह्याचा दर्जा द्यावा, हा ठराव टाळ्यांच्या गजरात वाचण्यात आला. तसेच जिल्ह्याच्या विकासाकरिता सरकारने अधिक निधी देण्याची मागणीही या ठरावात करण्यात आली. संमेलनाचे कार्यवाह प्रा. घनशाम दरणे ठरावाचे अनुमोदक तर सूचक प्रणव कोलते होते.