यवतमाळकरांना ग्रामविकासाचे धडे
By admin | Published: July 12, 2014 01:51 AM2014-07-12T01:51:02+5:302014-07-12T01:51:02+5:30
किडलेले दात स्वच्छ करणारा एक तरूण डॉक्टर ग्रामविकासाच्या कल्पनेने झपाटून जातो. रात्रंदिन त्याला गाव स्वच्छ करण्याचा ध्यास. असे करीत असतांना त्याला ...
यवतमाळ : किडलेले दात स्वच्छ करणारा एक तरूण डॉक्टर ग्रामविकासाच्या कल्पनेने झपाटून जातो. रात्रंदिन त्याला गाव स्वच्छ करण्याचा ध्यास. असे करीत असतांना त्याला प्रचंड विरोधही होतो. मात्र शांत स्वभावाचा हा तरूण मात्र काही दिवसांनी ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत होतो. गावे जेव्हा राष्ट्रीय पातळीवर चमकतात तेव्हा गांवकरी मात्र हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यालाच पाठवितात. या माणसाचे नांव आहे डॉ. अविनाश पोळ.
डॉ.अविनाश पोळ रविवार १३ जुलैला यवतमाळात येत आहे. प्रयास-सेवांकूर यवतमाळच्यावतीने महेश भवनात सायंकाळी ७ वाजता आयोजित व्याख्यानातून ते शहरवासीयांना ग्रामविकासाचे धडे देणार आहेत. सध्या राज्यामध्ये ‘पाणीबाणी’ सुरू आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना असूनही जलसंधारणाला पाहिजे तशी गती मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे अविनाश पोळ यांचे व्याख्यान दिशादर्शक ठरणार आहे.
शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी व्यावहारिक शिक्षणाचेही धडे घेतले. श्रमाचा संस्कार त्यांच्यावर झाला होता. ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाने त्यांचे अख्खे जीवनच पालटले. डॉक्टरकीचा पेशा करीत असताना त्यांच्या मनात ग्रामीण विकासाची तळमळ सुरू झाली. ग्रामीण भागातील अनारोग्याचे मूळ दुखणे त्यांच्या लक्षात आले. रस्ते, शौचालय, गटारे, पाणी, अंगणवाडी, व्यायामशाळा, समाजमंदिर आदी बाबींसाठी त्यांनी ग्रामीण भागात काम सुरू केले. लेबलेवाडी, शिवथर, आसगाव, दरे बु., आदी गावांना ग्रामीण विकासामध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. रोहयोवर काम करीत श्रमदान ही त्यांची संकल्पना देशपातळीवर महत्वपूर्ण ठरली. कृषी, वन, पर्यावरण आदी क्षेत्रात गावाला त्यांनी मजबूत केले.
मापरवाडी नावाचे टंचाईग्रस्त गाव आज पाण्याने समृद्ध झाले आहे. सातारा जिल्ह्यातून सुरू झालेली ग्रामविकासाची ही चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. एनजीओच्या बदनाम अर्थकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवलेल्या या माणसाने अनेक गावांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतलेली आहे. त्यांच्या ज्ञानाचा यवतमाळकरांना फायदा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)