यवतमाळमधील कृषी सचिवांनी घेतली आढावा बैठक, अनधिकृत किटकनाशके विकणा-यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 05:45 PM2017-10-02T17:45:18+5:302017-10-02T17:45:45+5:30
किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली.
यवतमाळ, दि. 2 : किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली. यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रधान सचिव बिजयकुमार म्हणाले, किटकनाशक फवारणीमुळे काही शेतक-यांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात भरती आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे कृषी विभागाने गांभिर्याने काम करावे. तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणेला अधिक सक्षम करून शेतक-यांना फवारणीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कृषी अधिका-यांनी किटकनाशक वापरण्याबाबत मार्गदर्शक सुचना शेतक-यांना फिल्डवर जाऊन समजवून सांगाव्या. केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने कृषी केंद्रांकडून अनधिकृत किटकनाशके विकली जात असेल तर त्याची चौकशी करा. अशा केंद्रांबद्दल कोणतीही सहानुभुती न दाखविता त्यांच्यावर त्वरीत कारवाई करा. कृषी केंद्र चालकांनीसुध्दा सामाजिक दायित्व जोपासून फवारणीबाबत शेतक-यांना योग्य सल्ला द्यावा. केवळ कंपन्यांच्या नफ्यासाठी काम करू नये. तसेच फवारणीदरम्यान विषबाधा होऊ नये म्हणून केंद्र चालकांनी शेतक-यांना हातमोजे, चष्मा असलेली किट स्वस्त दरात किंवा शक्य झाल्यास मोफत उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
यावेळी कृषी सचिवांनी जिल्ह्यात किती लोकांना विषबाधा झाली, मृतकांची संख्या किती, उपचार करून घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या, कृषी विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजना, रुग्णालयातील परिस्थती आदींबाबत माहिती घेतली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी. धोटे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सुरेश नेमाडे, मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, केळापुरचे नायब तहसीलदार टी.डी.बोनगीरवार यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत झालेले कळंब येथील देविदास मडावी यांच्या घरी प्रधान सचिव बिजयकुमार यांनी भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. अशोक उईके, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.