यवतमाळची अपर्णा शुक्ला लखनौैच्या ‘सीआरसी’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:45 PM2019-03-12T13:45:21+5:302019-03-12T13:46:24+5:30
जिद्द आणि परिश्रमाचा जोरावर यवतमाळ येथील अपर्णा रामकुमार शुक्ला हिने लखनौच्या (मध्य प्रदेश) केंद्रीय रिसर्च सेंटरमध्ये स्थान मिळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिद्द आणि परिश्रमाचा जोरावर यवतमाळ येथील अपर्णा रामकुमार शुक्ला हिने लखनौच्या (मध्य प्रदेश) केंद्रीय रिसर्च सेंटरमध्ये स्थान मिळविले आहे. यासाठी निवड झालेली अपर्णा ही भारतातील एकमेव विद्यार्थिनी आहे. वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करताना ती ज्यूनिअर सायंटिस्ट म्हणून शोधकार्य करणार आहे.
या रिसर्च सेंटरमध्ये निवडीसाठी जाहिरातीच्या माध्यमातून आॅनलाईन अर्ज मागविले जाते. दरवर्षी केवळ एका विद्यार्थ्याची पीएच.डी.साठी निवड होते. यावर्षी देशभरातून सुमारे एक हजार अर्ज दाखल झाले होते. यातून अपर्णा शुक्ला ही मानकरी ठरली आहे. ती चार वर्षात त्याठिकाणी निवासी राहून वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करणार आहे. यासाठी तिला संस्थेतर्फे शिष्यवृत्तीही मिळणार आहे. सेंटरच्या मंजूषा श्रीवास्तव यांचे तिला मार्गदर्शन लाभणार आहे.
विविध प्रकारच्या वनस्पतींवर ती संशोधन करणार आहे. औषधांसाठी उपयोगात येणाऱ्या वनस्पतींचा ती या चार वर्षांच्या काळात अभ्यास करणार आहे. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयातून बी.एससी. झाल्यानंतर तिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात एम.एससी. केले. सीएसआयआर-राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान लखनऊ येथे प्रवेश मिळवायचाच या जिद्दीने तिने तयारी सुरू केली. ७८ टक्केपेक्षा अधिक गुण घेत तिने या सेंटरमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले. यात तिला यशही मिळाले. या सेंटरमध्ये मिळालेला प्रवेश मोठी उपलब्धी मानली जाते. अपर्णाचे वडील रामकुमार शुक्ला हे एका खासगी बँकेत व्यवस्थापक, तर आई अंजू गृहिणी आहे. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राममनोहर मिश्रा, प्रा. गुप्ता, प्रा. चुडीवाले तसेच अँग्लो हिंदी हायस्कूलचे माजी प्राचार्य राजेंद्रप्रसाद तिवारी यांच्या मार्गदर्शनात अपर्णाने ही भरारी घेतली आहे.