यवतमाळच्या ‘अर्धांतर’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:28 PM2018-08-31T12:28:09+5:302018-08-31T12:31:23+5:30
यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली.
हमीदखाँ पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यवतमाळ येथील तरूण नीरज जवके यांनी अवघ्या १६ मिनीटांचा ‘अर्धांतर’ हा लघुपट निर्माण केला आहे. या लघुपटातून शेतकरी आत्महत्यांना पूर्ण विराम मिळावा म्हणून संघटन हाच उपाय असल्याचा संदेश देण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ‘दि मेकर्स इंटरनॅशनल फिल्म अॅण्ड व्हिडीओ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाने बाजी मारली. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक नीरज माणिकराव जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या लघुपटाने मिळवून दिला.
बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यासाठी पुण्याई प्रॉडक्शन व द ग्रुप आॅफ फ्युचरतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. अवघ्या १६ मिनीटाच्या या लघुपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्याच न दाखविता त्यावरील उपाय योजनाही दर्शविण्यात आले आहे. हेच या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
या लघुपटाचे लेखन व सहदिग्दर्शन धनश्री टेकाडे, संगीत कोमल झोपाटे, मार्केटिंग नयन टेकाडे, प्रकाश व्यवस्था मिलींद ठाकरे व वेशभूषेची जबाबदारी प्रतीक्षा पडोळे यांनी सांभाळली. कोलकाता येथील स्पर्धेत विविध देशांतून अनेक लघुपट सादर झाले. या स्पर्धेत भारतातर्फे ‘अर्धांतर’ या एकमेव लघुपटाला नामांकन मिळाले होते. या लघुपटात विजय जोशी, प्रसन्ना गुजलवार, चेतन चौधरी, प्रसाद मिसाळ, विनोद मुधाने या प्रमुख कलाकारांसह मयूर आथिलकर, पंकज रोकडे, निखिल गावंडे यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहे. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विपीन चौधरी, शैलेष डाखोरे, अनिल चौधरी, अवंती चौधरी, सायली चौधरी, प्रशांत गावंडे, अनिल टेकाडे आदींचे सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांचे संघटन आवश्यक
या लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघटनावर भर देण्यात आला. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही, असा संदेश लघुपटातून देण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्यासाठी एकत्र येऊन मार्ग शोधणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठी ‘अर्धांतर’ची निर्मिती झाल्याचे दिग्दर्शक नीरज जवके यांनी सांगितले.