यवतमाळच्या लेकीचा युरोपमध्ये डंका; फोर्ब्सच्या ३० युवा उद्योजकांमध्ये झळकली

By विशाल सोनटक्के | Published: March 9, 2023 10:36 AM2023-03-09T10:36:57+5:302023-03-09T10:38:20+5:30

थर्टी-अंडर-थर्टी : उर्जा क्षेत्रात लक्षवेधी गुंतवणूक

Yavatmal's Arfa Karani featured among Forbes' 'Under 30' young entrepreneurs | यवतमाळच्या लेकीचा युरोपमध्ये डंका; फोर्ब्सच्या ३० युवा उद्योजकांमध्ये झळकली

यवतमाळच्या लेकीचा युरोपमध्ये डंका; फोर्ब्सच्या ३० युवा उद्योजकांमध्ये झळकली

googlenewsNext

यवतमाळ : युरोपमधील तिशीच्या आतील ३० उद्योजकांची फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतली आहे. यामध्ये मूळ यवतमाळची असलेल्या आरफा कारानी हिचा समावेश झाला आहे. आरफा ही उर्जा क्षेत्रातील मोठी गुंतवणूकदार आहे. उर्जा संक्रमण तंत्रज्ञानामध्ये येत्या काही वर्षात २१० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त तिची गुंतवणूक असेल, असेही फोर्ब्स या मासिकाने गौरविताना म्हटले आहे.

आरफा कारानी ही मूळ यवतमाळ येथील मधुबन कॉलनीतील रहिवासी आहे. तिचे वडील हुसैन (राजू) हासम कारानी यांचा यवतमाळ येथे मोठा जिनिंग व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी येथील व्यवसाय बंद करून दक्षिण आफ्रिकेतील युगांडामध्ये इंडस्ट्री सुरू केली. आरफा ही त्यांची मुलगी. तिचे आठवीपर्यंतचे शिक्षण यवतमाळच्या फ्री मेथॉडिस्ट शाळेमध्ये झाले. त्यानंतर इयत्ता नववीसाठी ती उटीच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झाली. इयत्ता दहावी परीक्षेत तिने उज्ज्वल यश मिळवत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर बंगळुरूमधील इंटरनॅशनल स्कूलमधून तिने आयबी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये दाखल झाली.

तेथील केंब्रीज विद्यापीठाकडून भौतिकशास्त्र विषयात तिने पीएच. डी. केली. तेथेही ती सेकंड टॉपर राहिली. त्यानंतर लंडन येथीलच इकॉनॉर या ऑइल कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर तिने तेथेच स्वत:चा उद्योग सुरू केला. सोबतच क्लिमा या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा फर्ममध्ये तिने व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली. आता ती अलांत्रा या उर्जा क्षेत्रातील मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत असून, ती स्वत: मोठी गुंतवणूकदारही आहे. तिने उद्यम संघासाठी उर्जा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून, येणाऱ्या काही वर्षात उर्जा संक्रमण तंत्रज्ञानामध्ये आरफा कारानी हिची टीम २२० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करेल, अशी अपेक्षा आहे.

आरफाच्या आजोबांनी शुन्यातून निर्माण केले विश्व

आरफा कारानी हिचे आजोबा हासमभाई राणा कारानी हे सुमारे ७५ वर्षांपूर्वी गुजरातहून यवतमाळमध्ये आले. त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यानंतर ते कापूस विक्रीकडे वळले. हळूहळू या व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी यवतमाळमध्ये जिनिंग मिल सुरू केली. त्यानंतर ऑइल मिलही काढली. कापूस खरेदी-विक्री व्यवहारामुळेच आज कारानी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे आरफाचे वडील हुसेन कारानी यांनी सांगितले. मुलीच्या या यशाचे वृत्त ऐकल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.

तरुणांनो, स्पर्धेसाठी जगाची कवाडे खुली....

आरफा कारानी हिच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तिने या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. एकीकडे महिला दिन साजरा होत असताना मिळत असलेला हा सन्मान मोठा असल्याचे ती म्हणाली. कमी वयात उर्जा क्षेत्रात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे फोर्ब्सने माझी दखल घेतली. यवतमाळातील आणि महाराष्ट्रातील तरुण - तरुणींनी स्पर्धेसाठी पुढे यावे. सध्याच्या काळात संपूर्ण जगाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. या स्पर्धेत तुमच्या कष्टाला, मेहनतीला महत्त्व आहे. ती करण्याची तुमची तयारी असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया तिने लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Yavatmal's Arfa Karani featured among Forbes' 'Under 30' young entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.