यवतमाळला मोठी परंपरा

By Admin | Published: September 21, 2015 02:25 AM2015-09-21T02:25:11+5:302015-09-21T02:25:11+5:30

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेला बळी ठरण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत.

Yavatmal's big tradition | यवतमाळला मोठी परंपरा

यवतमाळला मोठी परंपरा

googlenewsNext

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची
जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन विशेष
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेला बळी ठरण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत. आदिवासी पाड्यापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धा पहावयास मिळते. यवतमाळ जिल्ह्याला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मोठी परंपरा आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक श्याम मानव यवतमाळ जिल्ह्याचेच. त्यांच्याच प्रेरणेतून यवतमाळात मोठी चळवळ उभी राहिली. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर अंकुश ठेवला. या चळवळीत ज्यांनी वाहून घेतले त्यांनी कशाचीही तमा न बाळगता लोकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रूजविण्याचा प्रयत्न केला.
समाजात रुढी, परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहे. या रुढी परंपरातूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते. अनेकदा भीतीतूनही अंधश्रद्धा फोफावत जाते. शहरी आणि ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या प्रकारात फरक दिसत असला तरी मानसिकता मात्र एकच असते. सुशिक्षित आणि अशिक्षितही अंधश्रद्धेत आकंठ बुडालेले दिसून येतात. अंधश्रद्धेतून अनेकदा जीवघेणे आणि अघोरी प्रकारही घडतात. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोमाने कार्य करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धेतून बळी गेल्याच्या काही घटना आहे. दोन वर्षापूर्वी घाटंजी तालुक्यातील चोरंबा या गावी सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा नरबळी देण्याची घटना उघडकीस आली. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्हाच नव्हे राज्य हादरुन गेले होते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक घटना दैनंदिन घडत असतात. एकीकडे विज्ञान वादाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे असा प्रकारही नवीन नाही.
कर्मयोगी गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून आयुष्यभर अंधश्रद्धेवर घणाघाती प्रहार केले. त्यांचे अनेक कीर्तने यवतमाळ जिल्ह्यात झाली. त्यातून अंधश्रद्धा निर्मूलनास मदतच झाली. शाम मानव यांच्या रुपाने देशाला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा खंदा पाईक या जिल्ह्याने दिला. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रकरणांचा भंडाफोड केला. आजही या चळवळीत काम करणारी मंडळी बाबा बुवांचा भंडाफोड करण्यास मागेपुढे पाहत नाही. पुरोगामी महाराष्ट्राने जादुटोणा विरोधी कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी म्हणून यवतमाळात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पोलीस ठाण्याशी संबंधित कायदे असल्याने पोलिसांसाठीही विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरित यवतमाळ जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आघाडीवर आहे.

Web Title: Yavatmal's big tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.