बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

By admin | Published: April 14, 2017 02:48 AM2017-04-14T02:48:40+5:302017-04-14T02:48:40+5:30

बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे.

Yavatmal's birth anniversary of Babasaheb Yavatmal is famous in Maharashtra | बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

बाबासाहेबांची यवतमाळातील जयंती महाराष्ट्रात प्रसिद्ध

Next

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा
अविनाश साबापुरे यवतमाळ
बाबासाहेबांचा भारतातील पहिला जयंती सोहळा यवतमाळात झाला, असे वडीलधारे सांगायचे. अख्ख्या महाराष्ट्रात यवतमाळची जयंती प्रसिद्ध होती. कारण इथला कार्यक्रमच तसा शिस्तबद्ध होता. हत्ती, घोड्यांवरून मिरवणूक निघायची. समोर लेझीम पथक, बैलबंडी आणि संपूर्ण मिरवणुकीला संरक्षण असायचे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे... ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व बुद्धिस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे सांगत होते, परिवर्तनाच्या विचारांनी भारलेल्या काळाच्या आठवणी!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’शी ते बातचित करीत होते. रवींद्र टेंभुर्णे यांचे वडील बालाराम टेंभुर्णे हे तत्कालीन समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अन् बाबासाहेबांचे निष्ठावंत पाईक. तेथपासून म्हणजे १९३६ च्या काळापासून या आठवणींचा पट उलगडत गेला.
कव्वाली, कलापथके, जलसे यांचाही जयंती उत्सवात समावेश असायचा. सासुरवाशीण मुलींना कोणीही दिवाळीत माहेरी आणण्याऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीला आणत होते. आज काही गोष्टी मागे पडल्या. मिरवणुकीत जल्लोष जरूर करावा, मात्र डीजे लावून नुसतेच नाचणे म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन नव्हे, असे ठाम मत रवींद्र टेंभुर्णे यांनी व्यक्त केले. कोलाहल माजेल, शिस्त बिघडेल, असे वर्तन टाळावे. आंबेडकरी तरुणांनी १८ तास अभ्यास करूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन टेंभुर्णे यांनी केले.
अन्न स्वाहा करणारा यज्ञ उधळला
बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते तेव्हा कोणत्याही गैरप्रकाराला कसा कडाडून विरोध करायचे, याची एक आठवण रवींद्र टेंभुर्णे सांगतात. १९६९ च्या सुमाराची ही गोष्ट. यवतमाळात दुष्काळाची स्थिती होती. अशात काही मंडळींनी आझाद मैदानात यज्ञ आयोजित करून तुप, तेल, धान्य त्यात स्वाहा करण्याचा घाट घातला होता. शंकराचार्य येणार होते.
आम्ही दलित पँथर, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला.
तुम्ही यज्ञ जरून करा, पण एवढे अन्न वाया घालवू नका, असा हट्ट धरला. शेवटी तो यज्ञच बारगळला.

सोशल मीडियातील वाद टाळा
आजही समाजातून अंधश्रद्धा संपलेली नाही. कट्टर धार्मिकवाद, जातीवाद नष्ट करून समतेच्या मूलतत्त्वाचा प्रसार झाला पाहिजे. समाज माध्यमांवर आज महापुरुषांविषयी खूप उलटसुलट माहिती बघायला मिळते. मात्र समाज माध्यमांवर संयम बाळगावा. मोबाईलवर वाद करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असे आवाहन रवींद्र टेंभुर्णे यांनी केले.

आंबेडकर आखाडा यवतमाळची ओळख
यवतमाळच्या पाटीपुऱ्यात डॉ. आंबेडकर आखाडा १९३६ मध्ये निर्माण करण्यात आला. साधारण ३०० महिला-पुरुष तेथे लाठीकाठीचे प्रशिक्षण घ्यायचे. महादेव मेश्राम, सदाशिव भागवत, प्रभाकर टेंभुर्णे, बालाराम टेंभुर्णे या आखाड्याचे वस्ताद होते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तेव्हा या आखाड्याचा खास सहभाग असायचा. रेतीची गाडी छातीवरून चालवणे, अणकूचीदार खिळ्यावर झोपून छातीवर घणाने दगड फोडणे, डोळ्यांच्या कडांनी गज वाकवणे असे साहसी प्रकार सादर केले जाई. कबड्डी आणि कुस्तीच्या स्पर्धा तर रोमांचक व्हायच्या. पहेलवानांना एक रूमाल आणि एक नारळ भेट दिला जाई.

पाटीपुरा सर्वात शिक्षित वस्ती
जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधरांची वस्ती म्हणून यवतमाळातील पाटीपुऱ्याची गणना झाली होती. नगरपरिषदेने केलेल्या एका सर्वेतून ही बाब समोर आली होती. भले ही वस्ती बकाल असेल पण बाबासाहेबांच्या प्रेरणेने इथले अनेक जण उच्च शिक्षित झाल्याचा आनंद टेंभुर्णे यांनी व्यक्त केला. जुन्या काळात हा भाग जिल्ह्यातील क्रांतिस्थळ होता. ‘दिलदार माणसांची दिलदार वस्ती आहे’ या कवितेतून टेंभुर्णे यांनी पाटीपुराबाबतच्या भावना सांगितल्या.

Web Title: Yavatmal's birth anniversary of Babasaheb Yavatmal is famous in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.