मराठी नाट्य स्पर्धेसाठी यवतमाळची आठ नाटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:47 PM2018-11-04T21:47:08+5:302018-11-04T21:47:53+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या केंद्रांवर केले जाते. यावर्षी चंद्रपूर केंद्रावर ५८ वी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत होत असून यासाठी जिल्ह्यातून आठ नाटके जाणार आहेत.
काशीनाथ लाहोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी राज्य मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या केंद्रांवर केले जाते. यावर्षी चंद्रपूर केंद्रावर ५८ वी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत होत असून यासाठी जिल्ह्यातून आठ नाटके जाणार आहेत.
कलाकांचन संस्थेच्या ‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिला प्रयोग १९ नोव्हेंबरला होत आहे. प्रेमानंद गज्वी लिखित, प्रमोद बाविस्कर दिग्दर्शित आणि विनोद बिंड निर्मित हे दोन अंकी नाटक आहे. कलारसिक संस्थेचा ‘अंधारवाटा’ या नाटकाचे लेखक अशोक आष्टीकर असून सतीश पवार दिग्दर्शक आहेत. २० नोव्हेंबरला हा प्रयोग सादर होणार आहे. कलाश्रय ज्ञान व कलासंवर्धन मंडळाचे ‘अम्मी’ हे नाटक २१ नोव्हेंबरला सादर होईल. या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाने, प्रशांत गोडे दिग्दर्शक, तर निर्मिती प्रमुख गोडे काका आहेत. विशेष म्हणजे, ‘अम्मी’ याच नाटकाचा प्रयोग पुन्हा २२ नोव्हेंबरला आहे. कला वैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेचे हे नाटक अविश वत्सल यांनी दिग्दर्शित केले आहे. राज पावसेकर निर्मिती प्रमुख आहे.
२४ नोव्हेंबरला ‘चारचौघी’ हे तीन अंकी नाटक सादर होईल. कल्याण बहुद्देशीय संस्था, प्रशांत दळवी लिखित व ललिता घोडे दिग्दर्शित हे नाटक आहे. पंचमवेद निर्मित ‘अनफेअर डील’ हे भगवान कृष्णा हिरे लिखित, राजाभाऊ भगत दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग २६ नोव्हेंबरला होईल. सिद्धीविनायक प्रतिष्ठान प्रस्तुत दोन अंकी नाटक ‘ग्राऊंड झिरो’ २८ ला सादर होणार आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून अशोक आष्टीकर हे यात भूमिका करीत आहेत. २९ला उडाण बहुद्देशीय संस्थेचे ‘उजळल्या दिशा’ या डॉ. सदानंद मोरे लिखित आणि नंदू मोहोड दिग्दर्शित हे नाटक आहे. बहुतांश नाटकांची प्रकाश योजना अशोक कार्लेकर यांची आहे.