यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

By admin | Published: April 17, 2017 12:19 AM2017-04-17T00:19:23+5:302017-04-17T00:19:23+5:30

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले.

Yavatmal's 'Hot Spot' | यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

Next

पारा ४३.५ : एप्रिलमध्ये शहरात शतकातील सर्वाधिक तापमान, दुपारी रस्ते सामसूम
रूपेश उत्तरवार  यवतमाळ
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले. गुजरात आणि राजस्थानचे वारे जिल्ह्याकडे वळले आहे. यामुळे तापमान ४३.५ अंशांच्या घरात पोहोचले. एप्रिल महिन्यात यवतमाळ शहरातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान खात्याने रविवारी घेतली. ही शतकातली पहिली घटना असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले.
यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रात तापमान नोंदविण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तेथील दस्तावेजानुसार जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान मे महिन्याच्या अखेरीस नोंदविले जाते. त्या तापमानाचा पारा ४२, ४३ अंशांपर्यंत असतो. आजवर एप्रिलचे तापमान ४० अंशापर्यंत चढलेले आहे. त्यामध्ये ४३.५ अंशापर्यंतचा पारा एप्रिलमध्यात आतापर्यंत वर चढला नाही. अचानक तापमानात झालेल्या वाढीने हवामान खातेही अवाक् झाले आहे.
यवतमाळ शहरात दुपारच्या वेळी रस्ते सामसूम होत आहे. दुपट्टा बांधल्याशिवाय घराच्या दारातही पाय ठेवणे कठीण झाले आहे. कुलरची हवाही गरम फेकत असल्याने दुपारच्या वेळी घामाघूम झाल्याशिवाय पर्याय नसतो. हवामान अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची लाट नाही. तर वाऱ्याच्या दिशेत एकाकी झालेला बदल याला कारणीभूत आहे. उत्तर अरबी समुद्रात उच्च वातावरणात प्रवाहचक्र निर्माण झाले आहे. यामुळे उत्तरेकडून आणि इशान्येकडून येणारे उष्णवारे वाळवंटाकडून मध्य भारताकडे वळले आहे. यासोबत सूक्ष्म उष्णतेची लाटही वाहत आहे. याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे.
यामुळे मार्च अखेरपासूनच तापमानात वाढ नोंदविली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ४३.५ अंशापर्यंत पारा वर चढल्याने अनेक उलथापालथ होण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. तर फुल व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. फळबागेला मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. उन्हाच्या चटक्याने सांभाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा सांभार जळाला आहे. याची वाढ खुंटली आहे. तर पालक, मेथी, आंबटचुका, तांदुळकुंद्रा या पालेभाज्याची वाढ खुंटली आहे. टमाटर परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. वांगे, भेंडी, ढेमस बरबटीला याचा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकाचे उत्पादन घटले आहे. ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याने यवतमाळकरांना उन्हाचे चटके बसणार आहे.

फुलबागा करपण्याच्या वाटेवर
फुलाच्या पाकळ्या अधिक नाजूक असतात. त्यांना उन्हाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे उगवलेले फुल करपत आहे. तर कळ्या उगवण्यापूर्वीच गळत आहे. गुलाब, गलार्डीया, लीली आणि मोगऱ्याला याचा फटका बसला आहे. बाजारात येणाऱ्या फुलाची संख्या घटली आहे. यामुळे फुल व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
आठवडी बाजारात ग्राहकांची घट
आठवडी बाजारात ग्राहकांची सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळते. उन्हाचा चटका वाढल्याने ग्रामीण भागाकडून शहराकडे येणाऱ्या ग्राहकाची संख्या घटली. यामुळे रविवारी बाजारात शुकशुकाट होता. आठवडी बाजारात दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना फटका सहन करावा लागला.

Web Title: Yavatmal's 'Hot Spot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.