राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले यवतमाळचे विधी वर्तुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 08:40 PM2019-09-08T20:40:17+5:302019-09-08T20:43:50+5:30

या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती.

Yavatmal's low circle deepened by the memory of Ram Jethmalani | राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले यवतमाळचे विधी वर्तुळ

राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले यवतमाळचे विधी वर्तुळ

Next

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : देशातील मातब्बर वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जिल्ह्याच्या विधी वर्तुळात काम करणारी प्रत्येक व्यक्ती गहिवरली. कारण अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणा-या या ज्येष्ठ विधिज्ञाने अगदी काही वर्षापूर्वीच यवतमाळ सारख्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागात विधीसेवा देणा-यांचे कान तृप्त केले होते. 

निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले. ‘भारतीय घटनेंतर्गत धर्मनिरपेक्षता’ हा त्यांचा विषय होता. 

या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती. त्यामुळेच हे व्याख्यानही अविस्मरणीय ठरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा होते. तर व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अ‍ॅड. प्रकाश चोपडा, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा उपस्थित होते. 

प्रेरणास्थळी वृक्षारोपण
विधी महाविद्यालयातील व्याख्यानापूर्वी अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी प्रेरणास्थळावर येऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण केली. तसेच प्रेरणास्थळ परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले. याभेटीच्या निमित्ताने यवतमाळातील कायद्याच्या अभ्यासकांना अ‍ॅड. राम जेठमलानी यांचा अत्यंत जवळून सहवास लाभला त्या संदर्भात बोलताना अ‍ॅड. प्रवीण जानी म्हणाले, या व्याख्यानामुळे आम्हाला कधीही न संपणारी शिदोरी मिळाली. तर डॉ. विजेश मुणोत म्हणाले, कायद्यासारखा विषय असूनही अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी सर्वांना कळेल अशा नर्मविनोदी पद्धतीने व्याख्यान दिले होते. 

विजय दर्डा यांच्या हस्ते हृदयस्पर्शी स्वागत 
यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी गौरवपत्र प्रदान करून राम जेठमलानी यांचे यवतमाळकरांच्यावतीने हृदयस्पर्शी स्वागतही केले होते. त्यानंतर यवतमाळ बार असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड.ए.पी. दर्डा, सिंधी समाजाच्यावतीने अ‍ॅड. जे.व्ही. वाधवाणी, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विजेश मुणोत यांनीही स्वागत केले. 

शंभराव्या वाढदिवसाची यवतमाळकरांची इच्छा अपूर्ण
अ‍ॅड. राम जेठमलानी यांचे २०१३ मध्ये यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात व्याख्यान झाले. त्यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा म्हणाले होते, माझ्या मित्रांपैकी ९१ वर्षीय राम जेठमलानी हे सर्वात तरुण व्यक्ती होय. त्यांचा शंभरावा वाढदिवस आपणास साजरा करावयाचा आहे. विजय दर्डा यांचे हे मनोगत ऐकताच सर्व श्रोत्यांनी ‘यवतमाळ-यवतमाळ’ अशी साद घातली. मात्र शंभरावा वाढदिवस गाठण्यापूर्वीच अ‍ॅड. राम जेठमलानी यांचे निधन झाले आणि यवतमाळकरांची इच्छाही अपूर्ण राहिली.

जिल्हाभरातून श्रोत्यांची गर्दी
देशपातळीवर गाजलेले खटले चालविणारे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. राम जेठमलानी साक्षात यवतमाळात येऊन व्याख्यान देणार हे कळताच जिल्हाभरातील चाहत्यांनी अमोलकचंद विधी महाविद्यालयात गर्दी केली होती. अ‍ॅड. जेठमलानी यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयांमध्ये काम करणारे सर्व न्यायाधीश, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. 

कार्ल मार्स्कने धर्माला अफुची गोळी संबोधले असले तरी भारतीय संविधान सभेने धर्माबाबत अतिशय चांगली तरतूद केली आहे. भारतीय संविधान आपल्याला धार्मिक सहिष्णुता शिकविते. धर्म प्रसारित करण्याची आपल्या संविधानात तरतूदही आहे. कुणी व्यक्ती आपल्या धर्म प्रसाराचे काम करीत असेल तर आपण त्याला खंजीर मारत नाही. त्याची गरजही नाही. कारण आपल्या संविधानाने युक्तीवाद करण्याची मुभा आपल्याला दिली आहे. 
- अ‍ॅड. राम जेठमलानी

(यवतमाळ येथे २४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिलेल्या व्याख्यानातील एक अंश)

Web Title: Yavatmal's low circle deepened by the memory of Ram Jethmalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.