शाहरूखच्या सिनेमाला यवतमाळचे संगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:09 PM2018-01-22T22:09:25+5:302018-01-22T22:11:33+5:30
तो दहावी पास झाला अन् हळूहळू डोळे अधू होऊ लागले... म्हणून आई म्हणाली त्याला सरकारी नोकरी लागली तर बरे होईल. पण शिक्षिका म्हणाल्या तू संगीतच शिक.
अविनाश साबापुरे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : तो दहावी पास झाला अन् हळूहळू डोळे अधू होऊ लागले... म्हणून आई म्हणाली त्याला सरकारी नोकरी लागली तर बरे होईल. पण शिक्षिका म्हणाल्या तू संगीतच शिक. त्याला आवड नव्हती, तरी शिक्षिकेच्या आग्रहाखातर संगीत विषयासह अकरावीला प्रवेश घेतला. हळूहळू गाणे शिकत गेला.. शिक्षिकेला खबर लागू न देता त्याने बँकेची परीक्षा पास करून बँकेत नोकरीही मिळविली. तर दुसरीकडे आईला थांगपत्ताही लागू न देता तो मुंबईच्या मायानगरीत संगीतकारही बनला!
सिनेमाची कथा वाटावी, अशी ही गोष्ट आपल्या यवतमाळातच घडली. अन् आता लवकरच शाहरूख खानच्या नव्या सिनेमाचा संगीतकार म्हणून त्याचे नाव चमकणार आहे... गौरव रमेशचंद्र कांबळे!
गौरव यवतमाळात जन्मला, वाढला. अमरावतीत घडला अन् मुंबईत पोहोचला. मायानगरीत गौरव कांबळेचा संगीतकार के. गौरांत झाला. हा प्रवास जरा रोचक आहे. येथील रेणुकानगरीत राहणारे रमेशचंद्र आणि शिला कांबळे यांचा हा मुलगा. दहावीपर्यंत त्याने साधा ‘सा’ही म्हटलेला नव्हता. अकरावीला प्रवेश घ्यायला तो दाते कॉलेजला गेला. तेथे संगीताच्या शिक्षिकेने त्याला संगीत विषय घेण्याची गळ घातली. पास होण्यासाठी सोपे जाईल म्हणून गौरवनेही संगीत विषय घेतला. पुढे बीए झाल्यावर तो अमरावतीच्या व्हीएमव्ही कॉलेजमध्ये संगीतातच एमए करायला गेला. तेथे कल्पेश कांबळे आणि सलीम अमानत अली खान या दोन मुंबईच्या विद्यार्थ्यांशी त्याची मैत्री झाली. घरच्यांना न सांगताच गौरव त्यांच्यासोबत गुपचूप मुंबईला जाऊन यायचा. मुंबई वारीत तो रेडीओ मीरचीवर आरजे म्हणूनही काम करू लागला. उस्ताद अमानत अली खान, गुलाम मुस्तफा खान, रेहान कादरी यांच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक शफाकत अमानत अली यांच्या ‘फ्यूजन बँड’मध्ये गौरवचीही वर्णी लागली.
त्याचवेळी आईच्या इच्छेखातर त्याने बँकेची परीक्षा पास करून नोकरीही मिळविली. सध्या तो यवतमाळच्या स्टेट बँकेत कस्टमर असिस्टंट आहे. आता यवतमाळ-मुंबई अशा दोन्ही तबल्यावर हात मारत त्याच्या जीवनाने छान सुर धरलाय. ‘फ्यूजन’मध्ये काम करता-करता शफाकत अमानत अली यांच्या ‘लेकीन’ अल्बमचे ‘लेकीन वो मेरा ईश्क हैं’ गाणे कंपोज करण्याची संधी गौरवला मिळाली. लगेच त्याने ‘तुही तु हैं’ गाणे कंपोज केले, त्याचे दुसरे व्हर्जनही केले. सोनू निगमशी भेट झाल्यवर तर त्याच्या वाटचालीला बहर आला. अलिकडे गाजलेल्या ‘तु हवीशी मला’ या सोनूच्या मराठी सिनेगीतासाठी अरेंजर म्हणून गौरवने काम केले. वैशाली सामंतच्या गाण्यासाठी अमित राजला असिस्ट केले. प्रसिद्ध गायक केके यांच्या ‘नैय्यो जीना’ अल्बमचे ‘एक मौका दे दे मुझे सॉरी केहने का’ त्यासोबतच ‘फ्रेण्डशिप डॉट कॉम’ सिनेमातील ‘वेड हे लागले मला’ गाणे गौरवने कंपोज केले.
गौरव ऊर्फ के . गौरांतची कारकीर्द अद्याप स्थिरस्थावर व्हायची आहे. त्यामुळेच सुरूवातीला काही खाचखळगेही त्याच्या वाट्याला आलेत. ‘रईस’मधील जालिमा, ‘सुलतान’मधील जग घुमिया, ‘बजरंगी भाईजान’मधील आशियाना, तु जो मिला अशी गाणी गौरवने केली आणि त्याला १५-२० हजारात ती नामवंतांच्या नावाने विकावी लागली. आज या गाण्यांनी कोट्यवधीचा धंदा केला. पण या गोष्टी अपरिहार्य असल्याचेही गौरव म्हणतो. पण लवकरच तो स्वतंत्र संगीतकार म्हणून ओळख निर्माण करणार आहे. शाहरूख खानच्या आगामी ‘झिरो’ सिनेमातील एका गाण्याचा संगीतकार म्हणून आपल्याला काम मिळाल्याचे गौरवने सांगितले. सोबतच २३ आॅक्टोबरला त्याचा ‘सुफियाना’ अल्बम रिलिज होतोय.
‘लाईक्स’च्या बळावर ४० हजारांची कमाई
गौरवने स्वत: कंपोज केलेल्या, इतर संगीतकारांसोबत केलेल्या, स्वत: गायलेल्या गीतांचे ६३ व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केले आहेत. एकेका गाण्याला लाखो ‘लाईक्स’ मिळताहेत. त्यासाठी यू-ट्यूबने त्याच्याशी करार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दर महिन्याला ४० हजार रूपयांचे मानधन मिळते, असे गौरवने सांगितले. एखादा व्हिडीओ फक्त ‘व्ह्यू’ झाला, म्हणजे कुणी पाहिला, तर ५० पैसे मिळतात. तो ‘शेअर’ झाला तर २ रूपये आणि ‘सबस्क्राईब’ झाला तर ५ रूपये असे मानधन मिळत असल्याचेही गौरव म्हणाला.
एका गाण्यासाठी २५ दिवस ‘स्विमिंग’
‘फ्यूजन’मधील काम पाहून संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी आपल्या ‘शिवाय’ अल्बममध्ये ‘ओम नम: शिवाय’ हे गीत गाण्यासाठी मुख्य गायक म्हणून गौरवला बोलावले. परंतु, हे संस्कृत गाणे गाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागल्याचे गौरव म्हणाला. ५ मिनिट १९ सेकंदाचे हे गाणे ‘ब्रेथलेस’ आहे. त्याचा सराव करण्यासाठी शंकर एहसान लॉय यांनी माझ्याकडून चक्क २५ दिवस ‘स्विमिंग’ करवून घेतले. सुरूवातीला तर खूपच घालून पाडून बोलले. मी कंटाळून १५ वेळा यवतमाळला निघूनही आलो. पण गीतकार कविंद्रकुमार यांनी धीर दिला. आणि शेवटी हे गाणे माझ्या आवाजातच साकारले, असे गौरवने सांगितले.
यवतमाळातून आॅनलाईन संगीत
गौरवच्या घरात कुणालाही गाण्याचा शौक नाही. तरीही संगीतकार म्हणून त्याच्या कारकीर्दीत पहिले १३ हजारांचे हार्मोनियम त्याला आईने दिले. भाऊजींनी गिटार दिले. तर व्हॉईस ओव्हर हे दीड लाखांचे सॉफ्टवेअर कल्पेश कांबळेने दिले. या साधनांच्या बळावर गौरव यवतमाळातच बसून ‘स्काईप’च्या आधारे रेकॉर्डिंग करू शकतो. पण बºयाच गाण्यांसाठी त्याला मोठ्या ‘मिक्सर अरेंजर’ची गरज पडते. हे अडीच लाखांचे उपकरण त्याला सलीम-अमृताभाभी यांनी दिले.