यवतमाळच्या वैज्ञानिकाचे नाव दिले लघुग्रहाला
By Admin | Published: July 22, 2014 12:05 AM2014-07-22T00:05:01+5:302014-07-22T00:05:01+5:30
अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील
फेथन लघुग्रह : दीर्घ अभ्यासानंतर यश
यवतमाळ : अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील कक्षा निश्चित केली. त्यांचे संशोधन कायमस्वरुपी आठवणीत राहावे म्हणून आता या लघुग्रहाला महाबळांचे नाव देण्यात आले. वैज्ञानिक क्षेत्रातली ही फार मोठी उपलब्धी असून यवतमाळच्या वैभवात मानाचा तुरा खोवला गेला.
डॉ. आशिष अरविंद महाबळ मुळ यवतमाळचे. १९७९ मध्ये अमेरिकेची स्कायलॅब पृथ्वीवर कोसळली. तेव्हापासून आशिषला अवकाश संशोधनाची प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. मुलाची अवकाशा विषयी जिज्ञासापाहून कुटुंबीयांनी त्यांना टेलीस्कोप दिला. शिक्षणा दरम्यान डॉ. जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनात त्यांनी अॅस्ट्रोफिजीक्समध्ये पीएचडी केली. १९९९ ला ते अमेरिकेत गेले. या ठिकाणी त्यांनी नासामध्ये अंतराळातील लघुग्रहाचा शोध घेतला. या शोधादरम्यान त्यांना साडेचार अब्ज वर्षापूर्वी जेव्हा सूर्यमाला घडत होती. तेव्हा मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान एक फेथन नावाचा ग्रह उदयास येत होता. मात्र गुरू आणि सुर्याच्या ओढातानीत या ग्रहाचे असंख्य तुकडे झाले. त्याच अवस्थेत ते आजतागायत सुर्याभोवती फिरत आहेत. या ठिकाणी फिरत असलेला लघुग्रह त्यांनी शोधुन काढला. अमेरिकेतील पॅसेडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅटलीना रियल टाईम ट्रान्झीयंट सर्वे या प्रकल्पाअंतर्गत कॅटलीना स्काय सर्व्हेचा डाटा वापरला जातो. डॉ. आशिष महाबळ हे या संस्थेचे सदस्य आहे. या सदस्यांनी रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातुन हा लघुग्रह शोधून काढला होता. पुढे त्याचा आकार व कक्ष ठरविण्यात डॉ. महाबळ यांना यश आले. त्यांच्या या योगदानाबद्दल मायनर प्लॅनेट संस्थेने या लघुग्रहाला महाबळाचे नाव दिले. हा ग्रह सूर्याच्या बाजूला ३० अंशावर आहे. (शहर वार्ताहर)